कळसूबाई शिखरावर अनोखा विवाह सोहळा

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अहमदनगर: लग्न ठरलं की पहिली धावाधाव सुरू होते, कार्यालयं शोधण्याची. पण कार्यालय, शोधाशोध या सगळ्याला फाटा देत विवेक आणि स्वप्नाली या दाम्पत्यानं अनोखा लग्नसोहळा साजरा केला.
लगीन लागलं… ना मानपान, ना आहेर, ना बँडबाजा… कळसुबाईच्या आशीर्वानं आणि गिरीप्रेमींच्या उपस्थितीत विवेक आणि स्वप्नाली बंधनात अडकले. सोबत होता उगवता सूर्य… सोसाट्याचा वारा… आणि गुलाबी थंडी… विवेक आणि स्वप्नालीच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण साजरा झाला… महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर.
महाराष्ट्राचं एव्हरेस्ट, कळसूबाई शिखर, समुद्र सपाटीपासून 1 हजार 646 फूट उंच. याच उंचीवर लग्नगाठ बांधण्याचा प्लॅन एका जोडप्यानं केला. नाशिकच्या विवेक आणि मुंबईच्या स्वप्नालीच्या लग्नाला जाण्यासाठी वऱ्हाडींनी पहाटेच्या अंधारातच कळसूबाई चढण्यास सुरुवात केली. बरं स्वप्नाली आणि विवेकला गिर्यारोहणाची सवय हो… पण इतरांचं काय…?

मजल दर मजल करत वऱ्हाडींचा प्रवास सुरु होता. बर फक्त चढाईच करायची नव्हती. तर लग्नासाठीचं सामानसुमानही चढवायचं होतं. पण आपल्या लाडक्या पोरांसाठी वऱ्हाडींनी सगळं काही केलं.

दोन तासांच्या चढाईनंतर आधी वऱ्हाडींच्या विश्रांतीसाठी तयार केलेला बेस कॅम्प आला. काही काळ विसावा घेतल्यानंतर पुढची चढाई लगेच सुरु झाली. कारण मुहूर्त तर गाठायलाच हवा पायात आलेले गोळे, शिडी मार्गाचा धोकादायक प्रवास आणि पावलागणिक लांबच जाणारं कळसूबाई हे सगळे अडथळे पार करून वऱ्हाडी अखेर महाराष्ट्राच्या टोकावर पोहोचली. भरजरी शालू आणि पुणेरी पोषाख परिधान करून नवरा आणि नवरीही आले. आणि सुरु झाल्या मंगलाष्टका.बरं इतकी चढाई केल्यानंतर वाटलं फार काही सोपस्कार होणार नाहीत. पण मंडळी या वऱ्हाडींचा स्टॅमिना दांडगा. सप्तपदी काय, होम हवन काय, सात फेरे काय सगळं काही यथासांग झालं.
अहो इतकंच काय हार घालतानाचे आढे-वेढे तर पाहण्यासारखे होते..