नागपूर : राज्यात यावर्षी सर्वत्र खऱ्या अर्थानं गुलाबी थंडीचा अनुभव येतो आहे. नाशिक, पुणे यासह सर्व राज्यातच हिवाळा जाणवतो आहे. उपराजधानी नागपूरलाही यंदा चांगलीच हुडहुडी भरली आहे.
डिसेंबर महिन्यात तब्बल 5 डिग्री सेल्सियस इतक्या निचांकी तापमानाची नोंद नागपुरात झाली आहे. विशेष म्हणजे हे नागपुरातील 46 वर्षातील सर्वात निचांकी तापमान आहे. याआधी 1968 मध्ये 5.5 डिग्री तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे उन्हाळ्यात विदर्भाची हीट अनुभवणाऱ्या नागपूरकरांसाठी ही थंडी चांगलीच सुखावणारी ठरते आहे.
पण, याच बरोबर जास्तीच्या थंडीमुळं सकाळी तुरळक लोकं रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. तसंच थंडीपासून बचाव करण्यासाठी चहा आणि गरम पेयांचा खप देखील वाढल्याचं चित्र आहे.