किशोरी आमोणकर काळाच्या पडद्याआड

0
12

मुंबई : प्रख्यात शास्त्रीय संगीत गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्याच्या निधनाने भारतातील शास्त्रीय संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला असून अनेक नामवंतांनी अतिशय तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या गाण्यातून अनेकांनी आपली संगीताची जाण प्रगल्भ केली होती.
किशोरी आमोणकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर अत्रवली घराण्याच्या श्रेष्ठ गायिका होत्या. स्वर व सुरातून भावनांना हात घालण्याचे सार्मथ्य त्यांचे होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले आहेत. किशोरी आमोणकर यांचा जन्म १0 एप्रिल १९३१ रोजी मुंबईत झाला होता. प्रख्यात दिवंगत गायिका मोगूबाई कुर्डीकर व वडील माधवदास भाटिया यांच्या त्या कन्या होत. आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही त्यांनी मार्गदर्शन घेतले. मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या. किशोरीताईंनी १९५0 चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट ‘गीत गाया पत्थरोंने’ (१९६४) साठी त्यांनी पार्श्‍वगायन केले. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होत्या.