नागपूर : नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावून नववर्षाच्या स्वागताला सलामी दिली. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बरसलेल्या अकाली पावसाने ‘थर्टी फर्स्ट’च्या उत्साहावर विरजण पडले. सर्व जिल्ह्यात बुधवारपासून ढगाळी वातावरण होते.
नागपूर शहरात गुरुवारी सायंकाळीही पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवारी सकाळी तर, काटोल व कळमेश्वर तालुक्यातील सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर वातावरण ढागाळ होते. गुरुवारी सकाळी नरखेड तालुक्यातील जलालखेडा, मेंढला, थडीपवनी, परिसरात पावासाच्या सरी कोसळल्या.
सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास काटोल शहर व नजीकच्या शिवारात पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कळमेश्वर तालुक्यातील येरला, फेटरी शिवारात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे गहू व हरभऱ्याला फायदा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कुही, भिवापूर, उमरेड, मौदा, रामटेक, पारशिवनी, कामठी, सावनेर, हिंगणा तालुक्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते.
अमरावती जिल्हा गारठला
अमरावती जिल्ह्यात १ जानेवारी रोजी सरासरी २३.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मात्र पावसाने कोठेही हानीचे वृत्त नाही. पावसामुळे जिल्हा मात्र गारठला आहे. नववर्षाच्या पहाटेवर धुक्याचे सावट होते. हुडहुडीमुळे शहरातील रस्ते ओस पडले होते. दर्यापूर तालुक्यातील घडा सांगवा, अचलपूर तालुक्यातील मल्हारा व कविठा परिसरात बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास बोराच्या आकाराएवढ्या गारा पडल्या.
परिसरात अनेक ठिकाणी पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने बरीच हानी झाली. अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा ओस पडल्याचे चित्र होते. पाऊस आणि थंडीमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे टाळले.
गहू, हरभरा आणि तूर या पिकांसाठी हा पाऊस पोषक असला तरी कपाशी आणि संत्र्याची या अकाली पावसामुळे हानी झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास गहू आणि हरभऱ्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस
अकाली पावसाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याला झोडपून काढले. उमरखेड तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीने गहू, हरभरा आणि केळी पिकाचे नुकसान झाले असून दुपारपर्यंत अनेक तालुक्यात पावसाची रिमझीम सुरूच होती. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून ढगाळी वातावरण होते. उमरखेड तालुक्यात बुधवारी रात्री २.३० वाजता वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. रात्री ३ वाजताच्या सुमारास सुपारी आणि लिंबाच्या आकाराची तब्बल १५ ते २० मिनिटे गार कोसळली. तर पाऊस सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होता. या गारपिटीचा तडाखा पळशी, नागापूर, कुपटी, पोफाळी, शिवर, सुकळी, जहागीर, नागेशवाडी, चिल्ली या गावांना बसला. हरभरा पिकाचे नुकसान झाले असून हवेमुळे गहू जमिनीवर झोपला. तूर वाकली असून केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. उमरखेड तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार उमरखेड तालुक्यात १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील बाभूळगाव, दारव्हा, नेर, कळंब, पुसद, दिग्रस, आर्णी, यवतमाळ या तालुक्यालाही पावसाचा जोरदार फटका बसला. रबी हंगामावर या पावसाचा विपरीत परिणाम होणार असून दुष्काळाच्या सावटात असलेल्या शेतकऱ्यांना अकाली पावसाने पुन्हा संकटात लोटले आहे.
वर्धेत पावसामुळे कोसळले विश्रामगृहाचे छत
थंडीने हुडहुडी भरविली असताना बुधवारी ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली़ यामुळे घसरलेला पारा पुन्हा १५ अंशांवर पोहोचला व थंडीपासून नागरिकांची सुटका झाली; पण तळेगाव (श्या़पं़) येथे मुसळधार पावसामुळे चणा तसेच अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले़ पावसामुळे विश्रामगृहाचे छतही कोसळले़ रात्रीपासूनच पावसाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजेरी लावली़ बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस सकाळी सुरूच होता़ सायंकाळी ५ वाजतानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली़ विद्युल्लतेच्या कडकडाटासह जोरदार नाही; पण पिकांवर अनिष्ट परिणाम होतील, असा पाऊस सुरू होता़ यामुळे कपाशी, तुरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे़ जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाल्याने तूर, चणा, गहू आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
चंद्रपुरातही पाऊस
बल्लारपूरसह चंद्रपूर शहरालाही गुरुवारी पावसाने झोडपले. या अकाली पावसाने रबीचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गडचिरोलीत पाऊस
गडचिरोली : गुरूवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास गडचिरोलीत पावसाला सुरूवात झाली. याकाळात गडचिरोली शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून आदिवासी विकास महामंडळाचा उघड्यावर असलेला धानही भिजला.