दिव्यांगांच्या कल्पकतेतून साकारल्या कलाकृती,आपण फाऊंडेशनचा पुढाकार

0
15

नागपूर,दि.5 : दिव्यांगांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन व त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजार मिळावा या उद्देशाने आपण फाऊंडेशन व धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रामदासपेठेतील विद्यापीठ लायब्ररी जवळच्या पूर्णचंद्र बुटी सभागृहात ५ मेपासून प्रदर्शन भरविण्यात आले असून दिव्यांगांच्या परिश्रमातून साकार झालेल्या घरगुती उपयोगाच्या सर्व वस्तू येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.या प्रदर्शनाला महापौर नंदा जिचकार,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नोकरी मिळाली नाही म्हणून निराश होण्यापेक्षा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून दिव्यांगांनी एकट्याने किंवा समूहाद्वारे या वस्तू तयार केल्या आहेत. यात त्यांची कल्पकता व त्यांनी घेतलेले परिश्रम सहज पहायला मिळते. जुने झालेले कपडे,भांडी, पेपर व निरुपयोगी वस्तूंपासून घरामध्ये लहानमोठ्या उपयोगासाठी येणाऱ्या आकर्षक व तेवढ्याच मजबूत वस्तू येथे बघायला मिळतात. सावनेरच्या मूकबधिर निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मोत्यांच्या वस्तू येथे आहेत. सण, समारंभाच्या काळात उपयोगात येणारे मोत्यांचे तोरण, मोत्यांचा गणपती, देवघरातील दिवे हे सर्व कलाकुसरीचा उत्तम नमुना असणारे आहेत. शाळेच्या शिक्षिका नलिनी आंगोणे व अर्चना काळे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू येथे आणल्या आहेत. सुगतनगरच्या चंदा काळे यांनी जुन्या वर्तमानपत्रांचा लगदा, निरुपयोगी कपडे आदींच्या आकर्षक सजावटीतून तयार केलेल्या पेपर मॅशी डॉल (बाहुल्या) लक्ष वेधून घेतात. घरातील शोकेस किंवा लग्नातील रुखवंतासाठी या डॉल उपयोगी ठरणाऱ्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या अशोक खेवले यांनी घरगुती उपयोगाच्या अनेक वस्तू प्रदर्शनात आणल्या आहेत. यामध्ये पायपुसणे, लेटर बॅग, जाळीच्या कुंड्या, हॅँडबॅग आदी वस्तू कधीही कामात येणाऱ्या आहेत. नागपूरच्या पशुपती भट्टराई यांनी वेस्ट कपडे, जुन्या ब्लँकेटचे तुकडे, ज्यूट व पोत्यांपासून तयार केलेले पायपुसणे, हॅँडबॅग, थैल्या आकर्षक कलाकृतीने सजवून तयार केल्या आहेत. या वस्तू घरात कायम उपयोगात येणाऱ्या आहेत. मनीषा चौधरी यांनी आणलेल्या घरसजावटीच्या व सण-समारंभाच्या वेळी उपयोगात येणाऱ्या वस्तू हेही या प्रदर्शनातील आकर्षणाचे केंद्र आहे.

आकर्षक कलाकृतीने सजविलेले काच व लाकडाचे चौरंग पाठ, पूजेचे लोटे व ताट, पानदान, दिवे हे सर्व डोळ््यात भरण्यासारखे आहे. यासोबतच खाद्यपदार्थ, हळद, मिरची पावडर, मसाल्याचे पदार्थ, पापड, कुरड्या, चिप्स आदी वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. शुक्रवारी महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे रीतसर उद््घाटन करण्यात आले. शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळत नाही म्हणून निराश होण्यापेक्षा त्यांनी असे कौशल्यपूर्ण काम करून व्यवसायाकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले. महानगरपालिकेकडून दिव्यांगजनांच्या गृहउद्योगांसाठी हवी ती मदत देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपण फाऊंडेशनचे राकेश पिने व अमृता अडावले यांनी हे आयोजन केले आहे. प्रदर्शनामध्ये दिव्यांग गृहउद्योजकांसह महिला बचत गटांचे मिळून ४० प्रकारचे स्टॉल लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दिव्यांगांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन राकेश पिने व अमृता अडावले यांनी केले.