(वृत्तसंस्था)
दिल्ली : आंध्र प्रदेशात मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त होत असलेल्या कोंबड्याच्या झुंजीच्या परंपरागत खेळावर बंदी घातली जावी अशा राज्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला रोखण्यासाठी सादर केलेल्या याचिकेत पशुकल्याण मंडळाला पक्ष बनविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज येथे दिले.
मुख्य न्यायाधीश न्या. एच.एल. दत्तू व न्या. ए.के. सिकरी यांच्या पीठाने, विशेष अनुमती याचिकेवर पशुकल्याण मंडळाला पक्ष बनविले जावे असे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले जात आहेत असे म्हटले.
येत्या सोमवारी या प्रकरणाची सुनावणी केली जाणार आहे.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिलेल्या आदेशात, पश्चिम गोदावरी जिल्ह्णात १० ते १६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त कोंबड्यांची झुंज व त्यातील सट्टेबाजीला तसेच पशुपक्ष्यांसोबत क्रूरतेची वागणूक, दारूची विक्रीसारख्या असामाजिक बाबी रोखण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
कोंबड्याच्या झुंजीला योग्य ठरविणाऱ्या याचिकेत, ही झुंज एक परंपरा व संस्कृती असून त्याविना सणाचे महत्त्व संपुष्टात येईल असे म्हटले होते.