मराठी भाषेच्या कार्यक्रमांचे व्यापक आयोजन व्हावे- लोकसभाध्यक्ष

0
26

मुंबई : आपल्या मराठी भाषेचा समृद्ध, प्रतिभासंपन्न वारसा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी भाषेच्या विविध कार्यक्रमांचे व्यापक आयोजन व्हावे, अशी सूचना लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केली. मराठी विश्वकोशाच्या 20 व्या खंडाच्या पूर्वार्धाचे प्रकाशन श्रीमती महाजन यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या प्रकाशन सोहळ्यास मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, मराठी भाषा विभागाचे सचिव श्रीकांत देशपांडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड, उपसचिव श्रीमती गावडे, मराठी भाषा विभागाच्या उपसचिव सुवर्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती महाजन म्हणाल्या, मराठी विश्वकोशामुळे मराठीमधून ज्ञानाचा खजिना आपल्या सर्वांना उपलब्ध झाला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्‍त्री जोशी यांनी काळाच्या पलीकडे विचार करुन मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आणि आज तर्कतीर्थांचा हा वारसा डॉ. विजया वाड पुढे नेण्याचे काम सक्षमपणे करीत आहेत. विश्वकोश मंडळामार्फत विश्वकोश, कुमारकोश, अंधांसाठी बोलका विश्वकोश, कन्याकोश याद्वारे मंडळाने आपल्यासाठी ज्ञानाचे भांडार उपलब्ध करुन दिले आहे, अशा शब्दात लोकसभा अध्यक्षांनी मंडळाच्या कार्याचा गौरव केला.

मराठीच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वांची

मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे म्हणाले की, आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकांनद यांची जयंती असून या निमित्ताने 20 व्या विश्वकोशाच्या पूर्वार्धाचे प्रकाशन होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मराठी भाषेचे पुढील 25 वर्षांसाठीचे धोरण ठरविण्यासाठी नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला मसूदा मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आज प्रकाशित करण्यात आलेले कुमार विश्वकोश हे जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आज आपल्यापैकी अनेकजण विकिपीडीयाचा वापर करतात. मात्र मराठी विश्वकोशाइतकी विश्वासार्हता विकिपीडीयाकडे नाही, अशा शब्दात श्री. तावडे यांनी विश्वकोशाचे महत्त्व अधोरेखित केले.

मराठी भाषेचे संवर्धन करणे, हित जपणे हे काम फक्त मराठी भाषा विभागापुरते मर्यादित नाही. हे काम आपल्या सर्वांचेच आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री. तावडे यांनी केले. मराठी भाषेतील साहित्याला ज्ञानपीठ, नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी तसेच मराठीतील अधिकाधिक साहित्य अनुवादीत होऊन लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मराठी भाषेतील माहिती विश्वकोशाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. मराठी भाषा किती संपन्न आहे याचा अनुभव आम्हाला दिल्लीत खासदार म्हणून काम करीत असताना येतो. माझ्यासाठी तर ‘जिथे जिथे मराठी तिथे तिथे उभा विश्वकोश तुझ्यासाठी’, अशीच स्थिती आहे. ब्रिटानिका आणि एन्सायक्लोपिडीयाच्या विश्वातही मराठी विश्वकोश टिकून आहे आणि माहितीसाठी अधिक वापरला जातो ही बाब आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
डॉ. विजया वाड यांनी मराठी विश्वकोशाच्या 20 व्या खंडाच्या पूर्वार्धात एकूण 690 नोंदी आणि 48 चित्रपत्रे असल्याचे तसेच सेई शोनागुन ते हर्षचरित इथपर्यंतच्या नोंदी असल्याची माहिती दिली. येत्या सहा महिन्याच्या आत 20 व्या खंडांच्या उत्तरार्धाचे प्रकाशन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभाध्यक्ष यांच्या हस्ते अनुषाचा सत्कार

दादरच्या अंध शाळेची विद्यार्थीनी अनुषा चेरला हिने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची ओळख करून दिली. यावेळी श्रीमती महाजन यांच्या हस्ते अनुषाचा सत्कार करण्यात आला. तिच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, अनुषाने माझा परिचय तिच्या भाषणातून करुन दिला, पण माझ्यासाठी एका अंध मुलीने डोळस बाईची ओळख करुन दिली, असे मी मानते.