मुंबई- राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे महिला तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना सूचवण्यासाठी माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, अशी शिफारस केली होती. ती राज्य सरकारने स्वीकारली असून त्याची अंमलबजावणी तातडीने होणार आहे.
कार्यालयीन परिसरात महिला अत्याचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर महिलांच्या संरक्षणासाठी महिला तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालय, सरकारी कार्यालयांत ,ग्रामीण भागातील कार्यालयांत, औद्योगिक अस्थापनांत अशा स्वरूपाची तक्रार निवारण केंद्रे स्थापली गेली. याच धर्तीवर शाळा, महाविद्यालय स्तरावर, तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) येथेही तक्रार निवारण केंद्रे असावीत, अशी मागणी होत होती. त्यातच निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनीही याची शिफारस सरकारला केली. त्यानुसार यापुढे शाळा, महाविद्यालयांत महिलांसाठी तक्रार निवारण समिती कक्ष स्थापण्यात येईल. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये महिलांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापण्याच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन एकत्रित माहितीसह त्यासंबधीचा अहवाल संबंधित विभागास तात्काळ सादर केला जाणार आहे.
राज्यभरातील शाळांत महिला तक्रार निवारण केंद्र
वाढदिवसाच्या शुभेच्छा