निकवर्तीयांना आता आठ लाखांची नुकसान भरपाई

0
14

मुंबई,-वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना आतापर्यंत पाच लाख आणि जखमींना साडेसात हजार रुपयांची शासकीय मदत दिली जात होती. मृतांच्या वारसांना दिल्या जाणार्‍या मदतीत तीन लाखांनी वाढ करून ही मदत आठ लाख, तर जखमींना दिल्या जाणार्‍या मदतीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, हत्ती, मगर, रानकुत्रे (ढोल) तसेच अन्य वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून सध्या पाच लाख तर जखमींच्या उपचारासाठी साडेसात हजारांची मदत दिली जाते. सदर रक्कम पुरेशी नसून, यात वाढ करावी अशी मागणी विरोधी पक्षात असताना गेली कित्येक वर्षे सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात लावून धरली होती. सरकारमध्ये आल्यानंतर वन मंत्रिपदाची जबाबदारी मुनगंटीवार यांच्याकडेच आल्यामुळे आपल्याच मागणीची पूर्तता करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आणि मुनगंटीवारांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्यासंबधीची घोषणा केली.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना पूर्वीच्या धोरणानुसार ७ हजार ५०० रुपयाचे अर्थसहाय्य दिले जायचे. या रकमेतदेखील दुप्पट वाढ करण्यात आली असून, नव्या तरतुदीनुसार जखमी व्यक्तीला औषधोपचारासाठी १५ हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे.