ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल नितनवरे कालवश

0
11

साकोली,दि.23 : विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद, “युगवाणी’चे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल नितनवरे (वय 53) यांचे आज (मंगळवार) हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. नितनवरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच, साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त होऊ लागली. त्यांची अंत्ययात्रा उद्या (बुधवार) दुपारी 12 वाजता नागपुरातील जयताळा येथील निवासस्थानावरून निघेल. डॉ. अनिल नितनवरे साकोलीतील एम. बी. पटेल महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी महाविद्यालयात असतानाच त्यांना छातीत दुखायला लागले. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा आहे. विद्यार्थीप्रीय प्राध्यापक, साहित्य चळवळीतील सक्रीय व्यक्तिमत्व तसेच उत्तम व मितभाषी मित्र गमावल्याची भावना साहित्य क्षेत्रात व्यक्त होत आहे.

‘युगसंवाद’ या साहित्य चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील साहित्यिकांना त्यांनी जोडले. विविध कविसंमेलनांचे आयोजन केले. कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्यासोबत “कवि आणि कविता’ या उपक्रमाच्या माध्यमातून दिग्गज कविंच्या मुलाखतींचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. विविध जिल्हा व युवा संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. अलीकडेच वणी (जि.यवतमाळ) येथे झालेल्या 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनात त्यांची पूर्णवेळ उपस्थिती होती. प्रा. दिलीप अलोणे यांच्या घरीच त्यांचा मुक्काम होता. गेल्याच आठवड्यात विदर्भ साहित्य संघाच्या 95 व्या वर्धापनदिन सोहळ्याला ते उपस्थित होते. सर्वांशी सातत्याने संपर्कात राहणारे आणि नव्या-जुन्या साहित्यिकांशी कायम नम्रतेने संवाद साधणारे डॉ. अनिल नितनवरे यांच्या निधनाने साहित्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.