शासनाचा सोशल मिडीया महामित्र उपक्रम

0
15

युवकांना संधी : विवेकशील समाज घडविण्यासाठी उचलले पाऊल
* मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजीटल प्रशस्तीपत्र
* सोशल मिडीया महामित्र पुरस्कार
* समाजमाध्यमांच्या सदुपयोगाबाबत ५ ते १७ मार्च गटचर्चा
* सहभागी होण्यासाठी १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी

गोंदिया दि. ३१ : राज्य शासनाने आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक कार्यासाठी उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देऊन विवेकशील समाज घडविण्यासाठी सोशल मिडीया महामित्र उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आधुनिक काळात सोशल मिडीया अत्यंत प्रभावी झाला आहे. बहुतांशी युवक या मिडीयावर सक्रीय असतात. सोशल मिडीया आता केवळ मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान उपलब्ध करुन घेण्याचे प्रभावी माध्यम ठरले आहे. लोकांचे मने आणि मते घडविण्याची ताकत सोशल मिडीयात असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्रॅम, ट्विटर आदिचा मोठया प्रमाणात वापर करीत आहे. त्यामुळे शासनाने सोशल मिडीयाची ताकत जाणून सोशल मिडीया महामित्र उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्यातून १० युवकांची सोशल मिडीया महामित्र म्हणून निवड केली जाणार आहे. त्यांना जिल्हास्तरावर समाजमाध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चेसाठी बोलाविले जाणार आहे. जिल्हास्तरावरील कार्यक्रम ५ ते १७ मार्च या दरम्यान होणार आहे.‍िजल्हाधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधि, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, अनुलोमचे सदस्य, समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या समवेत ही गटचर्चा आयोजित करण्यात येणार आहे.
चर्चेअंती प्रत्येक तालुक्यातून एका महामित्राची राज्यस्तरासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत युवकांना नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमातून सर्व सहभागीना मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सहभागींना जिल्हास्तरीय मान्यवरांची भेटवस्तू , लोकराज्य वार्षिक वर्गणी, महाराष्ट्र वार्षिकी पुस्तक तसेच जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
राज्यस्तरासाठी निवड झालेल्यांना मुंबईत जाण्यासाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. मान्यवरांना सोबत सेल्फी आपले विचार मांडण्याची संधी, मुख्यमंत्री यांचेसोबत फोटो, पारितोषिक व भेटवस्तू देण्यात येणार आहे. या संधीचा अधिकाअधिक युवकांनी लाभ घेऊन सोशल मिडीया महामित्र म्हणून पारितोषिक पटकवावे असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी Google play Store अथवा Apple च्या App Store वर MahaMitra हे अप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल. या अप्लीकेशनमध्ये नाव, वय,पत्ता हे तपशील देऊन नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी प्रक्रीया १ फेब्रुवारी रोजी सुरु होणार असून १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १५ वर्षावरील रहीवासी निशुल्क सहभागी होऊ शकतात. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त १५ वर्षावरील व्यक्तींनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.