पेट्रोल-डिझेलचे दर घटण्याची शक्यता

0
19

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा सरकारदरबारी विचार सुरु असून, यामुळे महागाईमध्ये होरपळणा-या जनतेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.डिझेलचे दर कमी झाल्यास महागाई काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. आगामी झारखंड आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय होऊ शकतो.
डिझेलच्या किंमती नियंत्रणमुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात होऊ शकते. १८ ऑक्टोंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने डिझेलच्या किंमती बाजारभावानुसार निश्चित करण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिला होता.
मागच्या दोन महिन्यात पेट्रोलच्या किंमती सातत्याने कमी झाल्या असून, पुन्हा एकदा पेट्रोलचे दर कमी झाले तर, ऑगस्टपासून सहाव्यांदा पेट्रोलच्या दरात घट होईल. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलांच्या किंमतीत चारवर्षात पहिल्यांदाच घट झाल्याने, देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात. दोन आठवडयांपूर्वी प्रति बॅरल तेल पिंपाची किंमत ८२.६० डॉलर होती. जूमध्ये प्रति बॅरल तेल पिंपाची किंमती ११५ डॉलर होती. बुधवारी हा दर ८७ डॉलर एवढा होता.