Home Featured News एसटीची दररोज ४० लाखांची बचत

एसटीची दररोज ४० लाखांची बचत

0

मुंबई – आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) दररोज दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र नुकतेच डिझेलचे भाव कमी झाल्याने एसटीला रोज ४० लाख रुपयांची बचत करणे शक्य झाले आहे. ही बचत होत असली, तरी उर्वरित काही कोटी रुपयांच्या नुकसानीला महामंडळाला रोज सामोरे जावे लागत आहे.
डिझेलचे दर वाढले की एसटीच्या बजेटवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे डिझेलचे दर वाढले की एसटीपुढे तिकीट दर वाढवण्याशिवाय पर्याय नसतो. अडीच वर्षापूर्वी हकीम समितीने डिझेलचे दर वाढल्यानंतर आपोआप भाडेसूत्रानुसार एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा अहवाल सादर केला होता.
या अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर या भाडेसूत्रानुसार महामंडळाकडून प्रवास भाडय़ात वाढ केली जाते. वर्षभरात डिझेलचे दर सातत्याने वाढत गेल्याने महामंडळाला वर्षभरात सलग तीन वेळा अंशत: का होईना, प्रवास भाडय़ात वाढ करावी लागली आहे. महामंडळाला फक्त डिझेल वाढीमुळे रोज दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यात टायर, चेसी हा खर्च वेगळा असल्याने महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर येणे अशक्य झाले आहे.
राज्य सरकारकडून एसटीचे थकीत देणेही वेळेवर मिळत नसल्याने रोज होणारा तोटा कसा भरून काढावा, हा प्रश्न अद्याप कायम आहे. आता डिझेलचे दर कमी झाले असले, तरी पुढे ते किती स्थिर राहतील हे सांगता येत नाही. पण, सध्या तरी एकूण होणा-या तोटय़ातून सुमारे ४० लाख रुपयांची बचत करता येत असल्याने तूर्तास तरी काहीअंशी महामंडळाला दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version