टिपागड किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष

0
33

कोरची दि. 6- तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या टिपागड पर्यटन स्थळाच्या डागडुजीकडे शासनाचे कायमचे दुर्लक्ष झाले असून सदर किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे.
टिपागडचा राजा पुरमशहाच्या दुदैवी अंतानंतर या किल्ल्यातील खजिना आपल्याला मिळावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यासाठी तत्कालीन गुरूबाबा यांच्यावर प्रचंड दबाव आणल्या गेला. त्याला कंटाळून गुरूबाबांनी टिपागडच्या ऐतिहासिक तलावात जलसमाधी घेतली, अशी आख्यायिका टिपागडबाबत सांगितली जाते. टिपागड हा किल्ला डोंगरावर आहे. या डोंगरावर तलाव असून या तलावामध्ये बारमाही पाणी राहते. हे एक निसर्गाचे आश्चर्य मानले जाते. एवढ्यामोठ्या उंचीवर वर्षभर पाणी कसे राहते, हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.
शासनाने या किल्ल्याची डागडुजी करून मार्ग तयार केला असता तर महाबळेश्वरला ज्या प्रमाणे पर्यटकांची गर्दी राहते, त्याचप्रमाणे या ठिकाणीही पर्यटकांनी हजेरी लावली असती. टिपागडच्या किल्ल्यातूनच टिपागडी नदीचा उगम होतो. शेकडो वर्षांपासून या ठिकाणाची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली आहे. भविष्यात संपूर्ण किल्लाच नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर किल्ल्याची डागडुजी करण्यात यावी, याबाबत कोरची तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा शासनाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यटनस्थळाप्रमाणे विकास केल्यास शासनाला यातून उत्पन्नही मिळणार आहे.