33.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home Featured News श्रमदानातून नागरिकांनी तयार केला नदीवर कच्चा पूल

श्रमदानातून नागरिकांनी तयार केला नदीवर कच्चा पूल

0
71

सालेकसा,दि.09ः-तालुक्यातील भजेपार येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती व अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, सूर्योदय क्रीडा मंडळ, गावातील सर्व भजनी मंडळ, महिला व पुरुष बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने भजेपार ते धानोली या मार्गावरील वाघ नदीवर लोकवर्गणी व श्रमदानातून कच्चा पूल तयार केला. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आवागमनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
भजेपार ते धानोली मार्गावर वाघनदीवर पूल नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. रहदारी करताना अडचण निर्माण होत होती. अवघ्या तीन किलोमीटर अंतरासाठी १५-२0 किलोमीटर फेर्‍याने जावे लागत होते. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मागील अनेक वर्षांपासून पुलांची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात होती. मागणी संबधित विभागाच्या वतीने दुर्लक्ष केले जात होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भजेपार येथील ग्राम पंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, सूर्योदय क्रीडा मंडळ, गावातील सर्व भजनी मंडळ, महिला व पुरुष बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून पुलाची निर्मिती केली.नागरिकांनी पुढाकार घेत तात्पुरत्या स्वरूपात पुलाची निर्मिती करून प्रशासनाला आरसा दाखविला. या स्तुत्य उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.