माजी खासदार नामदेवराव दिवटे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री

0
23

गोंदिया ,दि. १८- : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, जुन्या चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व लाखांदूरचे माजी आमदार नामदेवराव दिवटे यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने नागपुरात निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लाखांदूर (जि. भंडारा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. नामदेवराव दिवटे यांनी १९८५ व १९९० असे दोनदा लाखांदूर विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर १९९६ मध्ये भाजपने त्यांना तत्कालिन चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून तिकिट दिले. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा चिमूर लोकसभा क्षेत्रातून ते खासदार म्हणून निवडून आले.

माजी खासदार नामदेवराव दिवटे यांच्या निधनाने गोंदिया चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या आदिवासीबहुल भागातील सर्वसामान्य जनतेचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, श्री. दिवटे यांची तळागाळातील जनतेशी अतूट बांधिलकी होती. कास्तकारांचे प्रतिनिधित्व करताना या भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी निष्ठेने पुढाकार घेतला होता. याशिवाय विविध सामाजिक-धार्मिक उपक्रमातही ते सदैव कार्यरत होते.