ओबीसी आरक्षण बचावासाठी रस्त्यावरच्या लढाईची गरज:-रमेश बारसकर

मुंबईतील राज्यस्तरीय ओबीसी गोलमेज परिषद

0
195

मुंबई,दि.10ः-सध्याच्या घडीला राज्यामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाच्या मुद्याला घेऊन गदारोळ सुरु झालेला आहे.त्या परिस्थितीमध्ये आपल्या संविधानिक अधिकारासाठी येत्या काळामध्ये ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरून आरक्षण बचावाची भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे विचार ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी व्यक्त केले.ते मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय ओबीसी गोलमेज परिषदेत बोलत होते.

पुढे बोलतांना बारसकर म्हणाले की,जे आमदार,खासदारासह स्थानिक लोकप्रतिनिधी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतील त्यांना निवडणुकीत मतदान करण्यापासून जागृत ओबीसींनी टाळले पाहिजे तसेच इतरानाही आवाहन केले पाहिजे अशी रोखठोक भूमिका मांडली.तसेच ही परिवर्तनाची चळवळ असून कुणी स्वार्थासाठी किंवा राजकीय लाभासाठी काम करीत असेल तर त्यावरही विचामंथन करुन त्यांनाही समज द्यावे लागेल असे म्हणत ओबीसीतील सर्वच जातींना सोबत घेतल्याशिवाय चळवळच नव्हे तर आंदोलनही यशस्वी होणार नसल्याचे विचार मांडले. मंचावर ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रमुख माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे,बापट आयोगाचे सदस्य लक्ष्मण गायकवाड,बाळासाहेब सानप,मच्छिंद्र कांबळे,रेणूका येणके,भारतीय पिछडा(ओबीसी)शोषित संघटनेचे राज्यअध्यक्ष ज्ञानेश्वर गोबरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डाॅ.बबनराव तायवाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.