संचिका हाताळणीच्या त्रिस्तरीय रचनेमुळे कामांचा निपटारा जलद गतीने होण्यास मदत : अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर

0
14

नाशिक दि. 21जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या संचिका हाताळणीच्या त्रिस्तरीय रचनेमुळे लोकांच्या कामांचा निपटारा जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल विभागाच्या कामांचा आढावा बैठकीत अपर मुख्य सचिव डॉ. करीर बोलत होते. या बैठकीस विभागीय आुयक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर, सहायक आयुक्त (महसुल प्रशासन) कुंदन सोनवणे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, मालेगाव अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वर्षा मिना, कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास मिना, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, वासंती माळी, ज्योती कावरे, स्वाती थविल यांच्यासह उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव डॉ. करीर म्हणाले, महसुल विभागांतंर्गत येणाऱ्या अर्ध न्यायिक कामांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्धन्यायिक प्रकरणांतील बारकावे व त्याअनुषंगाने असणारे नियम, कायदे यांची माहिती होण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी यांना कायदे तज्ज्ञांमार्फत एक दिवसाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महसुल विषयक असणाऱ्या जनहिताच्या योजना स्वत:हून लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशा सूचनाही अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी यावेळी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या ई-ऑफीस, NashikMitra संकेतस्थळ यासारख्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध सुविधां विषयी माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेवा हक्क हमी अधिनियमांतर्गत देण्यात येणाऱ्या 81 सेवांची माहिती देवून त्याअंतर्गत किती नागरिकांनी या विविध सुविधांचा लाभ घेतला याबाबतची देखील माहिती सादर केली.