राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला मिळणार ‘इतके’ हजार रूपये

0
106

मुंबई – कोरोना महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. गेली दीड वर्ष झालं सर्व काही बंद आहे. या कोरोना महामारीचा फटका सर्वस्तरातील लोकांना बसला आहे. सरकार या सर्वांना मदत करताना पहायला मिळत आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राची सांस्कृतीक परंपरा जपत असतो. पण गेली दीड वर्ष झालं सर्व बंद असल्याने वारकऱ्यांना सुद्धा फटका बसला आहे.

राज्याचे सांस्कृतीक मंत्री अमित देशमुख यांनी सर्वांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यादृष्टीने राज्यातील लोककलावंताना मदत करण्यात आली होती. काल राज्यातील विविध वारकरी संघटना आणि सांस्कृतीक मंत्री यांच्यात बैठक झाली. त्यानुसार आज राज्य सरकारने वारकरी आणि किर्तनकार यांना मानधन देण्याचा निर्णय घोषीत केला आहे.

राज्याचे महसुल मंत्री आणि सांस्कृतीक मंत्री यांची बैठक पार पडल्यानंतर हा निर्णय झाला आहे. ठाकरे सरकारने राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे. काल बैठकीला विठ्ठल पाटील उपस्थित होते.

राज्य सरकारच्या या निर्णयाने राज्यातील वारकरी आणि किर्तनकार यांना दिलासा मिळाला आहे. राज्यभरात असे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक आहेत. ज्यांची कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. पण सरकारच्या निर्णयाने त्यांना न्याय मिळाला आहे, असं वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी म्हटलं आहे.