निलज- कारधा महामार्गाचे काम निकृष्ट;पवनी येथे काँग्रेसचा रास्तारोको

0
26

पवनी- तालुक्यातील निलज ते भंडारा तालुक्यातील कारधा पर्यंत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करित काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे गुरुवार 9 सप्टेंबर रोजी जवाहर गेट पवनी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
निलज ते कारधा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरण मागील तीन वर्षापासून सुरू आहे. अतिशय संथगतिने सुरू असलेल्या या महामार्गावर काही ठिकाणी खड्डे व भेगा पडलेले आहेत. अद्याप काम पूर्ण झाले नसताना रस्त्यावर खड्डे व भेगा पडल्याने या रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी करण्यात यावी, निकृष्ट दर्जाचे काम करत असताना अनेक नागरिकांचे जीवही गेले आहेत. त्याची चौकशी होऊन कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जावा, रस्त्याची उंची वाढत असल्यामुळे शेतातील पारंपरिक रस्ते बंद झालेत त्यांना लवकरात लवकर रस्ते तयार करून देण्यात यावे. तसेच महामार्गाची कामे करण्यासाठी गौण खनिज उत्खनाकरिता परिसरातील तलाव आणि इतर भागाचे नुकसान करून शासनाची महसूल बुडवल्याची सुध्दा चौकशी करावी, अश्या विविध मांगण्याच्या संदर्भात हे रास्तारोका आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले. आंदोलनात काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर तेलमासरे, राजेश तलमले, डॉ. ब्राम्हणकर, अमित जिभकाटे, निलेश सावरबांधे, बंडू ढेंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.