सहकारतपस्वी दिवंगत गुलाबराव पाटील जन्मशताब्दीनिमित्त विधानभवनात १६ सप्टेंबर रोजी कार्यक्रम

0
20

मुंबई, दि. 14 : सहकारतपस्वी, माजी राज्यसभा सदस्य आणि माजी विधानपरिषद सदस्य  दिवंगत गुलाबराव पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष 16 सप्टेंबर, 2020 ते 16 सप्टेंबर, 2021 या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. दिवंगत गुलाबराव पाटील यांची 12 वर्ष राज्यसभा सदस्य तसेच 6 वर्ष विधानपरिषद सदस्य म्हणून संसदीय कारर्कीद असून त्यांची अभ्यासू व उत्कृष्ट संसदपटू म्हणून ख्याती होती. संजय गांधी निराधार योजनेचे पहिले अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांनी राज्यातील सहकार आणि कृषी क्षेत्रात भरीव योगदानही दिले आहे.

दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (१९२१-२०२१) त्यांच्या १०० व्या जयंतीदिनी  “शताब्दी … एका विचाराची… कर्तृत्वाची” या सोहळ्याचे आयोजन गुलाबराव पाटील जन्मशताब्दी समितीच्या वतीने गुरुवार 16 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी ३.३० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. तर दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, हे भूषवतील. माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, आमदार नाना पटोले, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

“दिवंगत श्री. गुलाबराव पाटील जन्मशताब्दी समिती”चे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य श्री.पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष जलसंपदामंत्री  जयंत पाटील, कार्याध्यक्ष सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, हे असून जन्मशताब्दी समितीचे सदस्य म्हणून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, संसदीय कार्य राज्यमंत्री सतेज पाटील, वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, आणि कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील हे जबाबदारी संभाळत आहे. या कार्यक्रमास  सन्माननीय विधीमंडळ  सदस्यांना समितीतर्फे निमंत्रित करण्यात आले आहे.

कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मशताब्दी सोहळ्याचे संयोजन सहाय्य वि.स.पागे. संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी केले आहे.