महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

0
17

मुंबई, दि १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या समारंभास ‘रशियन हाऊस इन मुंबई’ या रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका डॉ.एलिना रेमिझोव्हा आणि रशियन भाषा विभागाच्या प्रमुख श्रीमती विद्या स्वर्गे-मदाने विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठमोळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. विधान भवनाचा आसमंत सनई-चौघडा व तुतारीच्या निनादाने मांगल्य आणि उत्साहाने बहरून गेला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अभिवादन केले.

महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे असे आवाहन करून त्यांनी राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव (समिती) तथा वि.का.अ. अनिल महाजन, उप सचिव शिवदर्शन साठे,राजेश तारवी,सभापतींचे सचिव श्री.महेंद्र काज, अवर सचिव  वि.श.कोमटवार,रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे,मंगेश पिसाळ, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य सुरक्षा अधिकारी, प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. या प्रसंगी विधानमंडळ सुरक्षा सेवेत उल्लेखनीय योगदान दिलेल्या सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा सहाय्यक यांना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच राष्ट्रपती यांचे गुणवत्ता पदक प्राप्त झालेल्या उप मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्रशेखर गोविंद सावंत यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

रशियन हाऊस इन मुंबईच्या संचालिका यांची विधान भवनमुंबई येथे सदिच्छा भेट.

या समारंभानंतर डॉ.एलिना रेमिझोव्हा यांनी सभापती आणि उपसभापती यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतांना त्यांनी मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या प्रमुख दोन शहरांमध्ये झालेल्या सिस्टर सिटी कराराला या वर्षीं ५५ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगून त्यानिमित्त आजपर्यंतच्या वाटचालीला उजाळा दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या संदेशात सभापती महोदयांनी भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबंधाच्या गौरवशाली परंपरेचा आवर्जून उल्लेख केला, त्याबद्दल त्यांनी या भेटीप्रसंगी अतिशय आनंद व्यक्त करीत ‘रशियन हाऊस इन मुंबई’ तर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली आणि या केंद्राला भेट द्यावी, असे निमंत्रण दिले. उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या रशिया भेटीतील अनुभवांना यावेळी उजाळा देत मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग शहरांना लाभलेला समृध्द सांस्कृतीक वारसा, अनुभव, पर्यावरण संवर्धन आणि साहित्य अनुवाद याबाबत आणखी आदानप्रदान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पाहूण्यांना गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.