उतावीळ नवऱ्याचे गुडघ्याला बाशिंग ;ओसरगाव येथील टोलनाका 28 मे पासून सुरु होणार

0
19

👉👉आपलेच दात आपल्याच ओठांना चावले तर जिल्हा वासियांमधून उसळणार संतापाची लाट!

सिंधुदुर्ग :-हायवेची सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू देणार नाही, आधी सुविधा नंतर टोल सुरु करणार या आणि अशा अनेक फसव्या आश्वासनांनी सिंधुदुर्ग वासीयांना गुंडाळून ठेवणाऱ्या सत्ताधारी मंत्री, खासदार, आमदार आणि विरोधी आमदारांच्या नावाने चांगभलं म्हणण्याची वेळ आता जिल्हावासीयांवर येऊन ठेपली आहे. कारण नॅशनल हायवे क्र. 66 वरील ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोलवसुली 28 मे 2022 पासून सुरू होणार असून त्याची रंगीत तालीम 27 मे च्या सकाळपासून ये-जा करणाऱ्या वाहनांना सुरू होणार आहे, फास्ट टॅग बंधनकारक आहे, अन्यथा दुप्पट टोलवसुली केली जाणार अशी पत्रके वाटप करण्यात येत आहेत.

मुळातच जोवर नॅशनल हायवेचे काम अपूर्ण असेल तोवर अशी टोलवसुली करता येते का? वाहनचालकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांचा थांगपत्ता नाही आणि टोलवसुलीचा ठेका मंजूर करून प्रत्यक्षात टोलवसुलीला हिरवा कंदील दाखविण्यामागे नेमका कोणाचा आर्थिक फायदा आणि आर्थिक साटेलोटे आहेत? टोलनाका सुरू करण्यासाठी चे नॉर्मस पूर्ण आहेत काय? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं येथील पालकमंत्री, खासदार, आणि सत्ताधारी व विरोधी असलेल्या आमदारांनी जनतेला देणे गरजेचे आहे.

हायवे चौपदरीकरणचे बांधकाम सुरू असताना सार्वजनिक कामाच्या आड येऊ नये या उदात्त हेतूने सिंधुदुर्गातील कैक जमीन मालकांनी आपल्या जमिनीवर हायवे चौपदरीकरण करण्यास मुभा दिली. त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बाधित जमीनमालकांना तात्काळ नुकसानभरपाई देऊ असे सांगितले. पण प्रत्यक्षात हायवे चौपदरीकरण मध्ये जमीन जाऊनही अद्याप मोबदला न मिळाल्याची आणि त्वरित कार्यवाही करतो अशी शाब्दिक भलावण करणारी आश्वासने मिळालेल्या अनेक जमीनमलकांची उदाहरणे खारेपाटण पासून ते अगदी झाराप पर्यंत आहेत.अद्याप जो काही हायवे बांधून झाला आहे त्याचे हस्तांतरणही झालेलं नाही, ना उदघाटन! तरीही ओसरगाव येथील टोलनाका मात्र 28 मे पासून सुरू होतोय सिंधुदुर्गातील जनता म्हणजे मुकी बिचारी, कुणीही हाका अशीच अवस्था येथील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी करून ठेवली आहे. ओसरगाव टोलनाका सुरू झाल्यानंतर देवगड, वैभववाडी, कणकवली तालुक्यातील आणि मालवण तालुक्यातील आचरा मार्गावरील गावातील वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.त्याचे काय? ओरोस हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्यामुळे महिन्यातून कामानिमित्त अनेकदा ओरोसला ये जा करावे लागते.त्याना प्रतिफेरी 90 रु. प्रमाणे नाहक आर्थिक भुर्दंड आहे.ओसरगाव टोलनाक्यावर असलेल्या ठेकेदाराच्या अमोल नामक मॅनेजरच्या म्हणण्यानुसार टोलनाक्यापासून केवळ 20 किमी अंतर परिसरातील वाहनचालकांना दरमहा 315 रु. भरून दिवसातून कितीही वेळा टोलनाक्यावरून ये जा करण्याची मुभा असेल. मग 20 किमी पेक्षा जास्त अंतर असलेल्या कणकवली तालुक्यातील नांदगाव, फोंडा, कनेडी, तळेरे, खारेपाटण पंचक्रोशी आणि वैभववाडी, देवगड तालुक्यातील व मालवण तालुक्यातील आचरा मार्गावरील वाहनचालकांनी काय करायचे? त्यांना हा मासिक पास का देता येणार नाही? त्यांचा काय दोष? किमान MH-07 पासिंग असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच वाहनांना हा दरमहा 315 रुपयांचा मासिक पास मिळणे अत्यावश्यक आहे. पालकमंत्री, खासदार आमदार या गंभीर बाबींकडे लक्ष देणार आहेत की, अजूनही एकमेकांकडे बोटे दाखवून राजकीय झिम्मा खेळणार आहेत?असा संताप जिल्हावासीय व्यक्त करत आहेत.