पुणे दि.२९: गावाचा विकास अधिक गतीने होण्यासाठी तयार करण्यात आलेली पेठ ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी आहे. पेठ ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
हवेली तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार शेवाळे, सरपंच सुरज चौधरी, उपसरपंच जयश्री चौधरी, प्रदीप गारटकर उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, पेठ ग्रामपंचायत इमारतीत बसणारे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व गरजूंची व नागरिकांची सर्व कामे त्वरित करावी. ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न आवश्यक आहेत. शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहाेचविण्यासाठी ग्रामपंचायत हे महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणाहून लोकाभिमुख, पारदर्शक, प्रामाणिक व सचोटीने काम करावे. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटाचा सामना करत राज्यातील विकासकामांना गती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या विविध योजना तसेच जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा परिषदेच्या योजना, आमदार निधीच्या माध्यमातून गतीने विकासकामे सुरू आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण भागाचा समतोल विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
पेठ गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मान्सूनचे आगमन वेळेत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यादृष्टीने खरीपाची तयारी करून ठेवावी. शेतकऱ्यांना खते, बियाणे कमी पडणार नाहीत, त्याबाबतचे काटेकोर नियोजन केल्याचे सांगून पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या पीक कर्ज योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरपंच सुरज चौधरी यांनी प्रास्ताविक केले.पेठ गावातील विकासकामाबाबत त्यांनी माहिती दिली
यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, विस्तार अधिकारी दत्तात्रय म्हेत्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.