दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधीची रक्कम जमा करणाऱ्यांची नावे जाहीर करावी-विरोधी पक्षनेते अंबादास दानवें

0
29

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ११ लाख रुपये रक्कम सापडल्यावर त्यांच्यावर ईडीची चौकशी करण्यात आली. मग शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसऱ्या मेळाव्यासाठी आरक्षित केलेल्या एसटी महामंडळाच्या विशेष बसेससाठी भरण्यात आलेल्या ९ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम भरलेल्या व्यक्तीची चौकशी करणार का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सदर व्यक्तीचा उत्पन्न स्रोत व ओळख जाहीर करण्याची मागणी एसटी महामंडळाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

शिंदे गटाने आयोजित केलेला दसरा मेळाव्यासाठी १७९५ एसटी महामंडळाच्या विशेष बसेस राज्यातून बुक करण्यात आल्या. या बसेस आरक्षित केल्यानंतर ९ कोटी ९९ लाख ४० हजार ५०० रुपये रोख स्वरूपात आगार व्यवस्थापक मुंबई आगार यांच्याकडे ३ ऑक्टोबरला भरले. या मेळाव्यासाठी १७९५ बसेसपैकी प्रत्यक्षात १६२५ बसचा बसेसचा वापर झाला. उर्वरित १७० बसेसचे भरलेल्या पैशांचा परतावा एसटी कोणाला करणार? सामान्य व्यक्तीला बँकेत ५० हजारापेक्षा जास्त रक्कम भरायची असल्यास त्याला अधिकृत ओळखपत्र सादर करावे लागते, मग इतकी मोठी रक्कम भरताना एसटी महामंडळाने त्याची विचारपूस केली का असा सवाल दानवे यांनी एसटी महामंडळाला विचारला आहे.

तसेच आरक्षित केलेल्या बसेस इतर आगारातून मागविण्यात आल्या होत्या का? इतर आगारातून बसेस पुरविण्यासाठी महामंडळाचे किती किलोमीटर व्यर्थ झाले व सदर व्यर्थ झालेल्या किलोमीटरची रक्कम पक्षकाराकडून भरली आहे का असे प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले.शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी विशेष बस सेवा परिपत्रकाचे उल्लंघन राज्य परिवहन महामंडळाकडून झाल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.