आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची गरज – सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत

0
10

मुंबई, दि. 11 : सुदृढ महाराष्ट्राची संकल्पना राबविण्यासाठी आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघ, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने महिला पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. धनंजय चाकूरकर, पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, कार्यवाह संदीप चव्हाण, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हुंजे, प्रा. एम.बी. टकले आदी उपस्थित होते. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत म्हणाले, राज्याच्या विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य यावर जास्त खर्च करण्याची आवश्यकता आहे. कारण या दोन गोष्टीचा सामान्य नागरिकांशी खूप निकटचा संबंध आहे. तसेच या दोन्ही गोष्टी विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या बाबींवर होणारा खर्च वाढायला हवा. राज्य शासनाच्या वतीने त्याबाबत उपाययोजना करण्यात येतील.

आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानास राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे मंत्री श्री. सावंत यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे 70 लाख महिलांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील साडेतीन कोटी महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी तर आभार स्वाती घोसाळकर यांनी मानले.

यावेळी डॉ. कपिल पाटील, डॉ. मीना अगरवाल, डॉ. गिरीश चौधरी , डॉ. अर्चना देवडी, माधवी रावळ, शलाका गावडे, निलिमा नगराळे आदींचा सत्कार करण्यात आला.