लोकराज्यच्या ‘विश्व मराठी संमेलन’ विशेषांकाचे प्रकाशन

0
6

मुंबई, दि. 4 : विश्व मराठी संमेलनाचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या जानेवारी-2023 च्या ‘लोकराज्य’च्या विश्व मराठी संमेलन विशेषांकाचे प्रकाशन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे उद्घाटन झाले, यावेळी हे प्रकाशन करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार आशिष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल आदी यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने वेळोवेळी ‘लोकराज्य’चे जे विविध विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले होते, त्यातील काही निवडक लेख या विशेषांकात संकलित करून पुनर्मुद्रित करण्यात आले आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या अनुषंगाने काही मूलभूत सूत्रांची मांडणी करणारे हे लेख वाचकांना नवा आनंद आणि नवी उमेद देऊन जातील.

हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.