इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सुविधेबद्दल महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

0
15

गोंदिया,दि.4 मार्च-इलेक्ट्रिक वाहनधारकांची गाड्यांच्या चार्जिंगची समस्या सोडविण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड २०२३’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे एका समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम (आयएसजीएफ) या संस्थेतर्फे २०१७ पासून ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड’ दिले जातात. वीज, पाणी, वायू आणि विद्युत वाहनांच्या क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित करणाऱ्या कंपन्यांना हे पुरस्कार दिले जातात. महावितरणला ‘इमर्जिंग इनोव्हेशन इन इलेक्ट्रिक मोबिलिटी डोमेन’ या वर्गवारीत विजेता म्हणून पुरस्कार मिळाला.

केंद्र सरकार व राज्य सरकारचे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्यासाठी महाराष्ट्रात महावितरणला राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष दर निश्चित करणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करणे, चार्जिंग स्टेशन उभारणे, वेब पोर्टल विकसित करणे आणि मोबाईल ॲप विकसित करणे असे विविध पुढाकार महावितरणने हाती घेतले आहेत.

महावितरणने स्वतःची ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स’ उभारण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी पॉवर अप नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्याचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनधारक जवळचे चार्जिंग स्टेशन शोधून काढू शकतो, स्वतः गाडीचे चार्जिंग करू शकतो आणि त्यासाठीचे पैसे ऑनलाईन भरू शकतो. महावितरणच्या चार्जिंग स्टेशनसोबत खासगी चार्जिंग स्टेशनबद्दल माहिती मिळण्यासाठी हे ॲप उपयोगी पडते. पॉवर अप या मोबाईल ॲप्लिकेशनमधील ‘मॅप मी’ या सुविधेच्या आधारे महावितरणच्या तसेच अन्य कंपन्यांच्या चार्जिंग स्टेशनची माहिती मिळते.

हे ॲप मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये काम करते. महावितरणला केंद्रीय पद्धतीने सर्व चार्जिंग स्टेशन्सवर देखरेख ठेवणे शक्य होते. आतापर्यंत या ॲप्लिकेशनवर २५०० खासगी व महावितरणची चार्जिंग स्टेशन्स जोडली गेली आहेत. यापूर्वी आत्मनिर्भर भारत शिखर परिषद स्कोच २०२२ पुरस्काराने या प्रकल्पाचा सन्मान झाला आहे.

महावितरणच्या कार्यालयात आणि सब स्टेशन्समध्ये इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन काही ठिकाणी उभारण्यात आली आहेत व ती मनुष्यबळाशिवाय चालतात. तेथे जाऊन वाहनचालक स्वतः चार्जिंग करून घेऊ शकतो. महाराष्ट्रात महावितरणने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्ससाठी विविध ठिकाणी जागा निश्चित केल्या असून चार्जिंग स्टेशन्सची संख्या गतीने वाढविण्याचे नियोजन केले आहे.