भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
2

मुंबई, दि. 27 : अमर शहीद हेमू कलानी यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत दिलेले योगदान मोठे आहे. महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले तेव्हा शहीद हेमू कलानी यांनी सहभाग घेतला होता. खूप हिंमतीने या चळवळीत आपले योगदान त्यांनी दिले. इंग्रजांनी त्यांना पकडले तेव्हा त्यांनी एकाही सहकाऱ्याचे नाव उघड केले नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व असे योगदान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज फाईन आर्ट, कल्चरल सेंटर, चेंबुर येथे अमर शहीद हेमू कलानी यादगार मंडळ विवेकांनद एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय सिंधू सभा यांच्या वतीने अमर शहीद हेमू कलानी यांचा जन्म शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास इंदौरचे खासदार शंकर लालवाणी, खासदार राहूल शेवाळे, अमर शहीद हेमू कलानी यादगार मंडळाचे सचिव बन्सी वाधवा, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश मलकानी, भारतीय सिंधू सभेचे सचिव लधाराम नागवानी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंचप्राण दिला आहे. त्याअनुषंगाने स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या शूरवीरांची आठवण सर्वांना व्हावी यासाठी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत.

इतिहास वाचून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे. इतिहासाच्या आठवणी जागविण्यासाठी आणि गुलामीला मोडून काढण्यासाठी अमर शहीद हेमू कलानी यांचे कार्य प्रेरणा देणारे होते. अमर शहीद हेमू कलानी यांचे कार्य तरुणांपर्यंत पोहोचावे यासाठी अभ्यासक्रमात त्यांच्या इतिहासाचा समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात येईल. सिंधू संस्कृती ही जगातील अतिप्राचीन संस्कृती आहे. जगातील सर्व देश आपल्या संस्कृतीला आदर्श मानतात ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे जगाला विचारांची ताकद देण्याची शक्ती भारतात आहे. असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.