‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
6

मुंबई, दि. 22 : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी  विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील ‘ओएनजीसी’ संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम विभागीय राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाल शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार माधुरी मिसाळ, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव आरती आहुजा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासन कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवित आहे. श्रम प्रतिष्ठेला महत्त्व देण्यात येत आहे. कामगार क्षेत्रासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ई-श्रम पोर्टल यामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या नोंदणीमुळे कामगार विविध योजनांचा लाभ घेवू शकतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रिकरण व समन्वय साधून कामगारांना लाभ देण्यावर भर देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

‘ई-श्रम कार्ड’साठी शिबिरांचे आयोजन करावे- केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे. यासाठी  ई-श्रम कार्ड अत्यंत महत्त्वाचे असून ते उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे. स्वनिधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना यांसारख्या योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रामुख्याने राबविण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. यादव यांनी सांगितले.

कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून कामगार विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. यावेळी नियोक्ता आणि कर्मचारी प्रतिनिधी यांचेसोबत त्रिपक्षीय बैठकही झाली. यावेळी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘ई-श्रम’ कार्ड

केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जातो. ‘ई-श्रम’ कार्डच्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळत आहे. असंघटित कामगार,  फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ होत आहे.