एमएमसीसीच्या पत्रकारिता विभागाचा द्विदशक वर्षोत्सव
पुणे : ``व्यावसायिकीकरणाच्या काळातही पत्रकारितेची नीतिमूल्ये जपता येतात. योग्य ते लिहिण्याचा पत्रकारांचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. उलट, तंत्रज्ञानातील बदलांमुळे माध्यम क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला असून पत्रकारांना लिहिण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत, “ याकडे ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी नुकतेच येथे लक्ष वेधले.
मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या वृत्तविद्या व जन संज्ञापन विभागाने यावर्षी विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने `द्विदशक वर्षोत्सवां`तर्गत पाच दिवसीय व्याख्यानमाला आयोजण्यात आली होती. या व्याख्यानमालेचा प्रारंभ श्री. गोखले यांच्या व्याख्यानाने झाला. `लोकमान्य टिळकांची पत्रकारिता व समकालीन पत्रकारिता` याविषयावर ते बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष बी. जी. जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘अथांग कॉन्टेन्ट क्रिएशन्स’चे संस्थापक संचालक व ‘स्टोरीटेल’चे सल्लागार सुकीर्त गुमास्ते, ‘बिग एफएम’ च्या प्रादेशिक संगीत व्यवस्थापक व सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी अपूर्वा जाधव, चित्रपट लेखिका व सहाय्यक दिग्दर्शक माधवी वागेश्वरी आणि ग्लोबल मीडिया (पुणे)चे संचालक वीरेंद्र विसाळ या विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनीही व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. गोखले यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना अपरिचित टिळक उलगडून दाखवले. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘ यंत्रशास्त्र’ हे पुस्तक लिहिणारे टिळक हे अद्ययावत तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत किती आग्रही होते हे लक्षात येते. विभागप्रमुख प्रा. संतोष शेणई यांनी प्रास्ताविक केले.
युट्युब व्हिडिओज, पॉडकास्ट सिरीज या नव्या माध्यमांचा उपयोग करून कशी कारकीर्द घडवता येईल, याविषयी श्री. गुमास्ते यांनी मार्गदर्शन केले. रेडिओसाठी जसा आवाज महत्त्वाचा, तसेच अभ्यास, हजरजबाबीपणा, शब्दसंपत्ती यांची आवश्यकता असते याकडे आरजे अपूर्वा यांनी लक्ष वेधले. एरव्हीच्या बिनधास्त हजरजबाबी खोडकर फिल्मी छोकरी आरजे अपूर्वा यांची प्राण्यांच्या बाबतीत असलेली संवेदनशीलता यावेळी उमजली. भुरळ पाडणाऱ्या मनोरंजन क्षेत्रात सखोल अभ्यासाची आवश्यकता असते, तसेच या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर वाचन अनिवार्य आहे हे वागेश्वरी यांनी समजावून दिले. जनसंपर्क क्षेत्रात कारकीर्दीसाठी अनेकविध संधी उपलब्ध असल्या तरी कौशल्यांच्या अभावी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची खंत श्री. विसाळ यांनी व्यक्त केली.
या द्विदशक वर्षोत्सवासाठी प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, विभाग प्रमुख संतोष शेणई, प्रा. स्वप्नील कांबळे व प्रा. सानिका कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.