पीएम विश्वकर्मा परिसंवाद व जनजागृती कार्यक्रम
· सरपंचांनी पुढाकार घ्यावा
· कौशल्य विकास विभागाचा सहभाग महत्वपूर्ण
· जास्तीत जास्त नोंदणी करावी
सिंधुदुर्गनगरी,दि.11: पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमुळे पारंपारिक कारागीर तसेच बारा बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक सहाय्य मिळणार आहे. पारंपारिक कुशल व्यवसायांचा वारसा पुढे नेण्याचा हेतू देखील यातून साध्य होणार आहे. या माध्यमातून कौशल्यपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होणार असून या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.
पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांच्या मदतीसाठी केंद्र सरकारच्या पी एम विश्वकर्मा योजनेसंबंधी परिसंवाद व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे अशासकीय सदस्य प्रभाकर सावंत, दिपक नारकर, शिखर बँक व्यवस्थापक श्री मेश्राम, लघु व सूक्ष्म उद्योग विभागाचे श्री जोहारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री दामले, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक श्री चिमणकर, खादी आयोगाचे श्री बराटे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.डी. कुरुंदवाडे तसेच जिल्ह्यातील सरपंच तसेच इतर नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, या योजनेमुळे बारा बलुतेदारांमधील पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला अधिक वाव मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आल्यावर त्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कौशल्य विकास विभागाने देखील पुढाकार घ्यावा. या योजनेचा जास्तीत जास्त लाभधारकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या व्यवसायात प्रगती करावी. या योजनेमुळे बलुतेदारांच्या व्यवसायाची गुणवत्ता वाढणार असून उत्पन्नात वाढ झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.
श्री सावंत म्हणाले, 18 घटकांसाठी ही योजना जाहिर झालेली आहे. पारंपारिक कारागीर व शिल्पकारांना सुलभ अर्थसहाय्य करणे व त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अल्प व्याजदरात मिळणार आहे. त्यासोबतच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या योजनेमुळे कारागीराच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची जपणूक सुध्दा होणार आहे. कारागिरांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दामले यांनी तर आभार श्री कुरुंदवाड यांनी मानले.