बारामती, दि.२1: बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील नागरिकांना पिण्याचे, शेतीचे पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे; त्यासाठी जनाई -शिरसाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे ३० दिवस पाणी सोडण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
सुपे येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, जलसंपदा विभागाचे पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, जनाई सिरसाईचे कार्यकारी अभियंता महेश कानिटकर, चासकमानचे कार्यकारी अभियंता पी.डी. गुंजाळ, खडकवासला पाटबंधारे विभागाचे श्वेता कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
कालवा सल्लागार समितीमध्ये लाभधारक शेतकऱ्यांचा प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल, असे सांगून श्री. पवार म्हणाले, पाणी टंचाई पाहता आता धरणांचे पाणीसाठ्याचे प्राधान्यक्रम बदलले असून प्रथम पिण्यासाठी, नंतर शेती आणि शेवटी उद्योगांना असा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी टंचाई निर्माण झाली तरी टँकरने पाणीपुरवठ्याची गरज पडणार नाही असे स्रोत निवडले आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविणार
टप्प्याटप्प्याने जनाई-शिरसाई आणि पुरंदर योजनेला लागणारी वीज सौर उर्जेद्वारे देण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल. त्यासाठी सौर पॅनल बसविण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी. सुपे येथे जागा उपलब्ध करून दिल्यास जनाई योजनेचे शाखा कार्यालय उभारण्यासाठी निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.
कऱ्हा नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन येणार असून या नवे तंत्रज्ञानासाठी ४५ कोटी पुरवणी मागण्यात मंजूर केले. त्याचे निविदा प्रक्रिया करून पावसाळ्यापर्यंत गतीने कामे पूर्ण करून घेण्यात येतील. आता त्याला अजून १५ कोटी अधिक लागणार असून लेखानुदानामधून त्याची तरतूद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाणी वापर संस्था अद्ययावत करण्यात येईल. मायनर क्र.६ च्या अपूर्ण कामांच्या अनुषंगाने कामांचा प्रस्ताव सादर करावा. नागरिकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने लवकरच बैठक लावून पुढील निर्णय घेण्यात येईल.
चौधरवाडी परिसराच्या अडीच हजार एकर क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना प्रस्तावित
चौधरवाडी येथे सुमारे २ हजार ५०० एकर क्षेत्राला पाणी देण्यासाठी उपसा सिंचन योजना करण्याचे प्राथमिक सर्वेक्षण केले आहे. नीरा नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून किंवा नीरा डावा कालव्यावरून करण्याचे प्रस्तावित आहे. येणाऱ्या पुरवणी मागण्या किंवा लेखानुदानमधून निधी देण्यात येईल. बारामती तालुक्यातील ७ आणि इंदापूर तालुक्यातील १२ गावांना लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणाचे पाणी देण्याचे नियोजन करुन पाणी देण्याचे नियोजन केले आहे.
यापुढे नवीन धरणे झाल्यास बंद पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचे धोरण करण्यात आले आहे. राज्यातील उपसा सिंचन योजनांचे पूर्वी ५ पट असलेले वीजदेयक महावितरणला अतिरिक्त रक्कम देऊन १ पट केली. त्यासाठी शासनाने ७०० कोटी रुपये महावितरणला दिले. मात्र पाणी पट्टी भरण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.
सुपा परिसरातील विकास कामांसाठी परगण्यामधील पायाभूत सुविधेकरीता ६५३ कोटींची कामे मंजूर करण्यात येत आहेत. त्यापैकी काही कामे सुरु आहेत तर काही निविदा प्रकियेत आहेत, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर यांनी केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम जगताप, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशव जगताप आदी उपस्थित होते.