आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू

0
8

मुंबई, दि. 01 : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहे. या निर्णयामुळे रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची नोंदणी लक्षणीय वाढली आहे. तसेच रुग्णांलयामध्ये काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरणे गरजेचे असून शासनाने याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. विभागातंर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये 1729 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत सातत्याने विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी त्यांनी बैठका घेऊन पदभरतीची प्रक्रिया गतिमान केली आहे. विभागातील सर्व रिक्त पदे भरून रुग्णांना विनाविलंब उपचार मिळण्यासाठी मंत्री डॉ. सावंत आग्रही आहेत. आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होऊन ती मजबूत होण्यास मदत होणार आहे. त्यानुसारच वैद्यकीय अधिकारी, गट-अ या संवर्गाची 1729 रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाने गठित केलेल्या उप समितीची मान्यता प्राप्त झालेली आहे. या पदभरतीसाठी  31 जानेवारी 2024 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या arogya.maharashtra.gov.in या संकतेस्थळावर अर्जांबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

वैद्यकीय अधिकारी, गट-अ ची पदे स्वतंत्र निवड मंडळामार्फत भरण्यात येणार असून उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी करून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तद्नंतर निवडीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया 15 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. यापूर्वीची पदभरती सन 2021 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर 3 वर्षांनी ही भरती करण्यात येत आहे. या भरतीद्वारे इच्छुक उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य संस्थेत रुजू होवून रुग्ण सेवा करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.