सातव्या युवा संसदेत खा.अशोक नेते यांचा ‘आदर्श खासदार’ म्हणून सन्मान

0
5

गडचिरोली : पुणे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट्स यांच्याकडून आयोजित दोन दिवसीय युवा संसदेत दि.२९ ला राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यात राज्याच्या टोकावरील गडचिरोली-चिमुर क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांना आदर्श खासदार म्हणून सन्मानित करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली या युवा संसदेचे उद्घाटन करण्यात आले. या सत्कार कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार विकास महात्मे, जाधवर ग्रुपचे संस्थापक प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील, माजी महापौर दतात्रय धनकवडे, नगरसेवक गणेश बिडकर, कार्यक्रमाचे आयोजक अॅड.शार्दुल जाधवर, तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.

तीन सत्रात झालेल्या या युवा संसदेत १) सामाजिक चळवळ आणि युवक २) सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत ३) भारतीय राजकारणाची ७५ वर्षे – किती नैतिक, किती अनैतिक? अशा तीन विषयांवर मंथन करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात खा.अशोक नेते यांनी युवकांनी चांगले काम करण्यासाठी चांगले ध्येय ठेवण्याचा सल्ला दिला.  गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विपरित परिस्थितीमध्ये आणि ७०० किलोमीटरपर्यंत विस्तारलेल्या लोकसभा क्षेत्रात सर्वदूर संपर्क ठेवताना अनेक अडचणी येतात. पण या क्षेत्राच्या संपूर्ण विकासासाठी भविष्यातही मी कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच दिलेल्या सन्मानासाठी त्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

राजकारण, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता या चार स्तंभाच्या आधारावर आपल्या लोकशाहीचा पाया मजबूतपणे उभा आहे. हे चारही घटक समाजव्यवस्थेत महत्वाचे आहेत. राजकारणाकडे सकारात्मक दृष्टिने पाहिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे युवा वर्गाने सामाजिक हितासाठी राजकारणात येण्याचे आवाहनही यावेळी खा.नेते यांनी केले.

विपरित परिस्थितीमध्ये करत आहेत प्रतिनिधीत्व

सशक्त भारत बनविण्यासाठी युवांना व्यासपीठ मिळवून देणे, युवकांमध्‍ये राजकीय आणि सामाजिक भान निर्माण करून त्यांच्या सुप्त गुणांना संधी देऊन सक्षम भारताच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीस योगदान देणे हा उद्देश ठेवून काम करताना जे समाजापयोगी चांगले काम करतात, अशा लोकांना जाधवर ग्रुपकडून सन्मानित करण्यात येते. गडचिरोलीचे आमदार आणि आता खासदार म्हणून अशोक नेते यांनी विपरित परिस्थिती असलेल्या भागाचे प्रतिनिधीत्व केले. आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी या अविकसित क्षेत्रात दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय आरोग्य, शिक्षण, सिंचन क्षेत्रात रेल्वे, महामार्ग या क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देऊन या भागातील अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांची या बहुमानासाठी निवड केली होती.