पुणे, दि.9 : पुणे चक्राकार मार्गामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे; हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नूतन निवासी इमारत, महात्मा गांधी पूलगेट बसस्थानकाचे आधुनिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास, संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाट नूतनीकरण व नागरिकांसाठी निवारा केंद्र, आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार योगेश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुणे रिंगरोड महत्त्वाचा असून त्यासाठी ८० टक्के भूसंपादन पूर्ण होत आहे. येत्या काळात या मार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहे. आयटीपार्कच्या भागात आस्थापनांपर्यत जाण्यासाठी मेट्रोला जोडून स्कायबस सुरू करण्यात येणार असून येत्या काळात भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामुळे आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता लागणार नाही आणि प्रदूषण होणार नाही.
वाहतूक नियोजनासाठी मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याचे काम करण्यात येणार आहे. खोपोली ते खंडाळा दरम्यान ९ किमी मिसिंग लिंकचे काम करण्यात येत असून यामुळे मुंबई-ते पुणे दरम्यानचे अंतर कमी होऊन वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहे.
पुणे शहरात २४ X ७ पाणी पुरवठा योजना, नदी सुधार कार्यक्रम यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांच्या माध्यमातून शहराचे चित्र बदलण्याचे काम सुरु आहे. पीएमपीएलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रीक बसची फ्लिट पुणे शहरात केली आहे. पुण्याचे या मॉडेलची देशात अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहराने ते स्वीकारले आहे. मेट्रोचे कामे अतिशय गतीने करण्यात येत आहे. सिव्हील कोर्ट ते स्वागेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली असून येत्या काळात मेट्रोचे तीन्ही मार्ग मिळून एकूण ५४ कि.मीचे मेट्रोचे जाळे सुरु करण्यात येत आहे. येत्या वर्षभरात टाटाच्या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौदर्यीकरण आणि ससून रुग्णालय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकरीता अतिशय अद्ययावत प्रकारचे निवासस्थान तयार करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विचार केला असून त्याच विचाराला अनुसरून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था होत आहे. महात्मा गांधी पूलगेट बसस्थानकाचा नीट नियोजन करत सर्वांगिण गरजांचा विचार करुन आराखडा तयार करण्यात आला आहे. संगम घाट येथील निवारा केंद्र आणि गणेश विसर्जनाचे नुतनीकरण तसेच छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल गार्डन तयार करण्यात येत आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून पुणे कॅन्टोन्मेंटमट विधानसभा मतदारसंघात बदल होतांना दिसून येत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात संरक्षण विभागाचा भाग असल्याने निर्बंध असून महानगरपालिका आणि शासनाला विकास करतांना समस्या निर्माण होत आहे. महानगरपालिकेप्रमाणे दिल्या जाणाऱ्या वस्तु व सेवाकर स्वरुपात परतावा दिला जातो त्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट मंडळाला निधी मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रातील योजना कॅन्टोन्मेंट मंडळाला लागू करण्याबाबत येत्या काळात पुणे महानगरपालिका, नगर विकास विभाग आणि सर्व संबंधित विभागासोबत बैठक घेण्यात येईल, अशा कॅन्टोन्मेंट मंडळातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रेल्वेच्या जमिनीवर एसआरएअंतर्गत झोपडपट्टीधारकांना घरे बांधण्यासाठी त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता जागा उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली आहे. त्याबदल्यात रेल्वे विभागाला इतरत्र राज्य शासनाची जमीन देण्यात येईल किंवा मोबादला देण्यात येणार आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांचा घरांचा उपलब्ध होईल तसेच अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागेल. याबाबत भारत सरकार सकारात्मक असून येत्या काळात निर्णय होण्याची अपेक्षा आहे. रहिवाशांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार सोबत चर्चा करुन मार्गच काढण्यात येईल, असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी दिले.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, गेल्या दीड वर्षात राज्यातील विकासाला गती मिळाली असून राज्यासह पुण्यातील अनेक पायाभूत सुविधांचा विकास शासनाने केला आहे. लहुजी वस्तादांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगून ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासाच्या इमारती व पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण ही कामे महत्त्वपूर्ण असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
आमदार श्री. कांबळे म्हणाले की, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाच्या विकासासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात ९० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. केंद्र सरकारने कॅन्टोन्मेंटचे महानगरपालिकेकडे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांना न्याय मिळेल, असे श्री. कांबळे म्हणाले. माजी मंत्री श्री.कांबळे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.