शासन आपल्या दारी च्या माध्यमातून २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ – मुख्यमंत्री
पालघर, दि. ११ : एकिकडे विकास साधला जात असतानाच आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे, स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन राज्यात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सिडको मैदान येथे आयोजित महासंस्कृती मोहत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून ) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून राज्यामध्ये २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. महिलांना सवलतीच्या दरात राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवास सुरु करण्यात आला. महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 12 हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. बंद असलेले सिंचनाचे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. असे अनेक लोकहिताचे निर्णय या शासनाने घेतले. हे सर्व निर्णय राज्यातील जनतेसाठी सर्व समाज घटकासाठी घेतले असून वैयक्तिक लाभाचा कोणताही निर्णय या शासनाने घेतला नाही .पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये तसेच परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य असून 22 कि.मी लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी -न्हावा शेवा ट्रान्स हर्बर लिंक या सागरीसेतूचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे. हा सर्व विकास साधला जात असताना आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे, यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त तसेच त्यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महानाट्याचे आयोजन केले आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे अदान – प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, कला व संस्कृतीचे जतन संवर्धन आणि स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात, अज्ञात क्रांतीवीरांच्या शौर्यगाथा जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव व महानाट्याचे आयोजन करण्यात आले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त तसेच त्यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महानाट्याचे आयोजन तसेच राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे अदान,प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, कला व संस्कृतीचे जतन संवर्धन आणि स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात, अज्ञात क्रांतीवीरांच्या शौर्यगाथा जिल्ह्यातील नागरीकापर्यंत पोहचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव व महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.