लघु उद्योजकांना प्रोत्साहनासाठी ‘महाखादी कला सृष्टी प्रदर्शन २०२४’चे आयोजन

0
5
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 17 : खादी हा केवळ एक धागा नसून विचार आहे. हा विचार जागृत ठेऊन लघुउद्योजकांची प्रगती साधण्यासाठी महाखादी कला सृष्टी 2024 या प्रदर्शनाचे मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन लघुउद्योजकांच्या कामाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाखादी कला सृष्टीचे उद्घाटन श्री.साठे यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त विकास आयुक्त प्रकाश वायचळ, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे (सीडबी) महाव्यवस्थापक अंजनीकुमार श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, लघु उद्योग महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम, उद्योग विभागाचे उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

श्री.साठे यांनी महात्मा गांधी यांनी खादीला प्रतिष्ठा मिळवून दिल्याचा उल्लेख करून सध्या खादीच्या कपड्यांना अधिक मागणी असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील खादी वापरण्याचे आवाहन करून लघु उद्योजकांना मोठे उद्योजक बनण्याची प्रेरणा दिली आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनास भेट देणारा प्रत्येक जण खादीचा दूत असून खादीचा प्रचार, प्रसार होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने खादीचे एकतरी उत्पादन वापरून खादीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.

श्री.श्रीवास्तव यांनी महाखादी कला सृष्टीसारखे प्रदर्शन हा खादीला प्रोत्साहन देण्याचा उत्सव असल्याचे सांगून सीडबी राज्यशासनासह मिळून विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. फरोग मुकादम यांनी या प्रदर्शनामध्ये पैठणी कशी तयार होते याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात पाहायला मिळणार असून नागरिकांनी या कारागिरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. अधिक रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील असून प्रदर्शन हे ग्राहकांना उद्योजकांपर्यंत तसेच उद्योजकांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे एक माध्यम असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आर.विमला यांनी खादी हा सर्वांना एकत्र आणणारा धागा असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, कोणताही चांगला बदल हा स्वत:पासून होतो याचा आदर्श गांधीजींनी घालून दिला. आजचे लघुउद्योजक देखील अशा बदलाची सुरुवात लघु उद्योगाच्या माध्यमातून करीत असून शासन अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून लघुउद्योजकांना मदतीचा हात देत आहे, व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून मार्केटिंग सुद्धा केले जात आहे. याचा लाभ घेऊन स्वत:ची उन्नती साधावी. लघु उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे असून त्यांनी स्वत:ची क्षमता ओळखावी. नागरिकांनी खादी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

या प्रदर्शनात 100 हून अधिक स्टॉल्स असून हे प्रदर्शन 16 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.