सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

0
2
  • हँडस ऑन प्रशिक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ईव्हीएम मशीन उपलब्ध केल्या जातील
  • जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा १९५० हा टोल फ्री क्रमांक आहे
  • मतदारांना १८ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करता येणार

सोलापूर, दिनांक 21(जिमाका):-भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर करून 7 मे रोजी मतदान व 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तरी या निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण देण्याबाबत सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियोजन करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे, निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार हे ऑनलाइन द्वारे उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्याकडे नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण त्वरित पूर्ण करण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून त्यानुसार प्रशिक्षण द्यावे. निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी लागत असल्याने अशा कर्मचाऱ्यांना लहान लहान गटात चांगल्या पद्धतीने निवडणूक प्रशिक्षण द्यावे. तसेच या निवडणूक कर्मचाऱ्यांना हँड्स ऑन प्रशिक्षण म्हणजे प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळण्याबाबतचे प्रशिक्षणही उत्कृष्टपणे द्यावे जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांना ईव्हीएम मशीन योग्य प्रकारे हाताळणे शक्य होईल, अशा सूचना त्यांनी दिल्या.

भारत निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणुकीपासून 85 वर्ष वय झालेले मतदार तसेच दिव्यांग मतदारांना होम बेस्ड वोटींग ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अशा मतदारांकडून फॉर्म 12 ड भरून घेण्याबाबतची कार्यवाही सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावी. जे मतदार मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकत नाहीत अशाच मतदारांसाठी ही सुविधा आहे, याबाबत अशा मतदारांमध्ये जागृती करावी व त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यावेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.

कोणत्याही शासकीय योजना संबंधी बॅनर्स, पोस्टर व अन्य ठिकाणी राजकीय नेत्यांचे नावे, फोटो असतील तर ते काढून घ्यावेत. जिल्ह्यात कोणत्याही कार्यक्रमात राजकीय व्यक्ती सहभागी होत असतील तर अशा कार्यक्रमासाठी सिंगल विंडो येथून परवानगी घेणे आवश्यक आहे. याशिवाय ते कार्यक्रम घेता येणार नाहीत तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हिडिओ सर्विलन्स टीम पाठवून अशा कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण करून घ्यावे. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने  दैनंदिन अहवाल पाठवायचे आहे ते अहवाल व्यवस्थितपणे पाठवावेत अशा सूचना ही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्वजण अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच दैनंदिन अहवाल वेळेत पाठवण्याबाबत सूचित केले. उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी पोस्टल बॅलेट व ईडीसी मतदानाविषयी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले. तर उपजिल्हाधिकारी निवडणूक श्री. निऱ्हाळी यांनी स्विप ऍक्टिव्हिटी अंतर्गत 7 मे 2024 पर्यंत मतदार जनजागृती करता येईल अशी माहिती दिली. तर 18 एप्रिल 2024 पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू राहील. त्याप्रमाणेच स्ट्रॉंग रूम, मतदान केंद्रावरील सुविधा, पेंटिंग ऑफ बूथ, रूट प्लॅन, कंट्रोल रूम सेटअप तसेच जिल्हास्तरावरील कंट्रोल रूमचा टोल फ्री नंबर 1950 असल्याची माहिती देऊन निवडणूक प्रशिक्षणासाठी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देणे या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.