राज्यमंत्री वायकरांनी बळकावली आदिवासींची जमीन

0
5

मुंबई – गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आदिवासींना सोईसुविधा देण्याच्या नावाखाली आरे कॉलनीतील 20 एकर जमिनीवर अतिक्रमण केले आहे. पदाचा गैरवापर करून जमीन बळकावण्याचाच हा प्रकार असून, या प्रकरणी चौकशी करून वायकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. वायकर यांनी या प्रकरणी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

आदिवासींना सोईसुविधा देण्याच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या भूखंडावर वायकर यांनी व्यायामशाळा उभारली. 350 मीटर जागा मंजूर झाली असतानाही त्यांनी नियम तोडून अधिक जमिनीचा ताबा घेतला. तेथे उभारण्यात आलेला पहिला मजलाही बेकायदा आहे. तेथे स्टीम व सोनाबाथ तसेच 30-35 खोल्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यामागील सुमारे 20 एकर जमीनही ताब्यात घेण्यात आली. तिची किंमत 20 ते 30 कोटी रुपये आहे. वायकर यांच्या पत्नीशी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित संस्थेला हे काम देण्यात आले, असे निरूपम म्हणाले.

याबाबत आरे प्रशासनाने म्हाडाशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. वायकर यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून तेथे अतिक्रमण केले आहे. भूखंड बळकावण्याचा हा गंभीर प्रकार असून, या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वायकर यांचा राजीनामा घेण्याची, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांनी केलेले बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी करणार आहोत, असे निरूपम यांनी सांगितले. या प्रकरणी लोकायुक्तांकडेही तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.