डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक थोर शिक्षणशास्त्री- कुलगुरू डॉ. विष्णू मगरे

0
3

❖ मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन

मुंबई, दि. १५ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर या॔नी भारतीय शिक्षण व्यवस्थेसंबंधी मांडणी, विशेषतः उच्च शिक्षणाच्या सर्वच ज्ञानशाखात समाजहितैषि “विद्यार्थी घडवणे” या प्रणालीस निती मानून त्यानुरूप शैक्षणिक व्युवरचना करून व तीस अनुरूप अशा अध्यापन व अध्ययन पद्धतीचा अवलंब केल्यास प्रबुद्ध, प्रशिक्षित व वाकबगार विद्यार्थी निर्माण केले जावू शकतात आणि अशी सुज्ञ माणसे स्वत: बरोबरच, समाज व देशाला प्रगतीपथावर नेण्यात जीवनाच्या विविध क्षेत्रात महत्वाची भुमिका बजावत आपली कर्तबगारी सिद्ध करू शकतात, अशा परिवर्तनशील क्रांतिकारी विचारांची मांडणी ते मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच शिक्षक म्हणून तसेच विद्यापीठाच्या परीक्षांचे परिक्षक म्हणून काम करत असताना, केली आहे असे प्रतिपादन प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी केले. आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या अनेक उल्लेखनीय तरतुदी बाबासाहेबांनी यापूर्वी विशद केल्या असून त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची एक थोर शिक्षण शास्त्री म्हणूनची ओळख अधोरेखित होते असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांशी संवाद साधत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, जंयती उत्सव समितीच्या निमंत्रिका प्रा. मनिषा करणे यांच्यासह विविध विभागातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे कुलगुरू डॉ. विष्णू डॉ. मगरे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. एलफिन्स्टन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण, सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक आणि शासकीय विधी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून बाबासाहेबांनी मोठे योगदान दिले आहे. विधीच्या शाखेच्या पाच वर्षीय अभ्यासक्रमाची कल्पना व शिफारश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टिकोनाचा महत्वपूर्ण पैलू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी सर्वसमावेशक शिक्षणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.अजय भामरे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विविध क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला, तसेच विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सप्ताहाच्या वतीने आठवडाभर राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. जयंती सप्ताहाच्या निमंत्रिका प्रा. मनिषा करणे यांनी जयंती सप्ताहाच्या अहवालाचे वाचन केले. जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित संविधान गौरव यात्रेसाठी शारीरिक शिक्षण विभागाच्या लेझिम पथकांने अनेकांचे लक्ष वेधले.