37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत मुंबईत

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत मुंबईत

0
167

blank

मुंबई:-राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे २७ जून ते १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

आगामी काळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, यामुळे या अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत, तर महायुतीला अपेक्षीत जागांवर विजय मिळवता आलेला नाही. यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. या अधिनेशनामध्ये राज्यातील दुष्काळ आणि अन्य विषयांवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे, तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधिमंडळात गाजणार असल्याची चर्चा आहे.

blank