आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना राज्य सरकारकडून मिळणार २० हजार रुपयांचे अनुदान

0
39
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई:-आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र भरातून निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. वारकरी साहित्य परिषद मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली. वारकरी साहित्य परिषद मंडळाच्या शिष्टमंडळाने दिंड्यांना ५० हजार रुपये द्यावेत, अशी सरकारकडे मागणी केली होती. चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.

पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शेकडोच्या संख्येने दिंड्या-पालख्या दरवर्षी निघत असतात. या सगळ्या पालख्या पायी चालत आषाढीच्या आधी एक दिवस पंढपुरात पोहोचत असतात. परंतु या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात, दुखापतग्रस्त होतात, एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत लोकांचा मृत्यू होतो. तसेच अनेकांना अनेक कारणांनी वारी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडेल, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन शासनाने २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

वारकरी साहित्य परिषदेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाने म्हणणे ऐकून घेऊन ५० हजार रुपयांऐवजी २० हजार अनुदान देण्याचे मान्य केले. शासनाच्या निर्णयाने महाराष्ट्रभरातल्या जवळपास दीड हजार वारकरी दिंड्यांना अनुदान मिळणार आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.