नागपुरात ओबीसी संघटनांची बैठक, प्रकाश शेंडगे यांनी काय इशारा दिला

0
45
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर : लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांची तयारी विविध संघटनांनी सुरू केली आहे. नागपूरमध्ये रविवारी ओबीसी जनमोर्चा, ओबीसी बहुजन पार्टी, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा यांची बैठक आमदार निवासात झाली. माजी आमदार प्रकाश शेडगे यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे शेडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या बैठकीनंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी बैठकीतील मुद्द्यांचा आढावा घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली. काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवाव्या. सरकारने सगे सोयऱ्यांचा जीआर काढू नये, अन्यथा रस्त्यावर उतरु, अशी ओबीसी संघटनांची भूमिका असल्याचं प्रकाश शेंडगे म्हणाले.

नव्याने घेतलेल्या ५७ लाख नोंदी रद्द कराव्यात. शिंदे समिती बरखास्त करावी. राष्ट्रीय स्तरावर जात निहाय जनगणना करावी. केंद्राने जनगणना केली नसल्यामुळे बिहारच्या धर्तीवर राज्यात करावी. वेगळ्या विदर्भासह छोट्या राज्याची निर्मिती करावी. मराठा समाजाला दिलेला निधी त्याचा दुप्पट महाज्योति आणि मंडळाला लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावं. विदर्भाचे विभागीय अध्यक्ष प्रा. रमेश पिसे यांची नियुक्ती देखील या बैठकीत करण्यात आल्याचं प्रकाश शेंडगेंनी सांगितलं.ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यामुळे ही बैठका घेण्यात आली. जो कोणी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल त्याला पाडल्याशिवाय आता ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही, असंही शेंडगे म्हणाले.