‘वक्फ’ बोर्डाच्या ७० हजार एकर जमिनीवर अनधिकृत ताबा

0
13

नागपूर – ‘वक्फ’ बोर्डाची राज्यात एकूण एक लाख एकर जमीन असून त्यातील ७० हजार एकर जमिनीवर अनधिकृतपणे काही लोकांनी ताबा मिळवला आहे. काहींना बाजारभावापेक्षा कमी दराने भाडेतत्त्वावर दिले आहे. तर काही ठिकाणी कोणताही व्यवहार न करताच ताबा मिळवला आहे.

‘वक्फ’ बोर्डाच्या सर्व जमिनींची तपासणी करून जिथे अनधिकृत किंवा नियम डावलून ताबा मिळवला असेल तर ती जमीन ताबडतोब काढून घेतली जाईल, अशी ग्वाही अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिली.‘वक्फ’ बोर्डाच्या मालकीच्या जमिनी खासगी व्यक्तींनी निर्धारित कि मतीपेक्षा कमी कि मतीने बळकावल्या आहेत.

अल्पसंख्याकांच्या मालकीच्या या जमिनी धनदांडग्यांनीच अनधिकृत हडप केल्या आहेत. त्या ताब्यात घेणार का, असा तारांकित प्रश्न मालेगावचे आमदार आसिफ शेख आणि मानखुर्दचे आमदार अबू आझमी यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना खडसे म्हणाले की, ‘वक्फ बोर्डाची एकंदर एक लाख एकर जमीन महाराष्ट्रातील मोठय़ा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्याचे भावही कोटींच्या घरात आहेत. काही लोकांनी शंभर वर्षाच्या लीजवर (भाडेतत्त्वावर) नाममात्र किमतीत घेतले आहे. तर काहींनी बाजारभावापेक्षा कमी दराने भाडेपट्टय़ाने घेतले आहेत. एक लाख एकरपैकी ७० हजार एकरवर असे अतिक्रमण आहे. याची चौकशी करून ज्या जमिनी अनधिकृत हडप केल्यास ताब्यात घेतल्या जातील, असे खडसे यांनी सांगितले.