पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत साताऱ्याचा अमोल घुटुकडे राज्यात पहिला

0
111

सातारा:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरिक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत दिवड (ता. माण. जि. सातारा) येथील अमोल भैरवनाथ घुटुकडे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत पोलीस उपनिरीक्षक पदास गवसणी घातली आहे. अमोल याने सांगली येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. नोकरी लागली मात्र लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली. मग थेट गावाकडे मोर्चा वळवला. दिवड गावी आल्यानंतर एमपीएससीचा अभ्यास करण्याचे निश्चित करून लॉकडाऊननंतर काही दिवसातच पुणे गाठले. पुण्यात दिवस-रात्र एमपीएससीचा अभ्यास करून थेट पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

अमोल घुटुकडे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिवड येथे, तर बारावीचे शिक्षण म्हसवड येथे झाले . अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण बुधगाव (जि. सांगली ) येथील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पूर्ण केले. या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना कॅम्पसमधून मुंबई येथे अमोलला नोकरीची संधी मिळाली. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडली आणि नोकरीही गेली. त्यानंतर अमोल याने मुंबईहून थेट गाव गाठले. मुळातच अभ्यासात हुशार असलेला अमोल याने तेथे गेल्यानंतर एमपीएससीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आपण या परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ असा त्याला आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर त्याने दिवडहून थेट पुणे गाठले.

पुणे येथे आल्यानंतर त्यांनी एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी क्लास लावला आणि पहिल्या प्रयत्नात त्याने पोलीस उपनिरीक्षकपदास गवसणी घालत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा दिली. त्याचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले. त्याच्या यशामुळे सातारा जिल्ह्यासह माण तालुक्याचा झेंडा महाराष्ट्रात उंचावला आहे. अमोल यांचे म्हसवडपासून पाच किलोमीटर अंतरावर दिवड हे गाव असून साधारण दीड हजार लोकवस्ती आहे. त्याचे आई-वडील धनगर कुटुंबातील असून दोन एकर जमीन आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन करतात. अमोलला मोठा भाऊ व बहीण आहे. मोठ्या भावाचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे, तर बहिणीचे डीएड झाले असून ती विवाहित आहे. आई- वडील अशिक्षित असून तिन्ही मुलांना त्यांनी जिद्दीने शिक्षण दिले.