कोल्हापूर,दि.२३ः- नागपूर मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना शासनाने शासकीय वसतिगृहातून बाहेर काढले आहे. त्यांचा दोष काय तर शासनाने 15 ऑगस्ट दिवशी उद्घाटन करण्याचे आश्वासन देऊनही उद्घाटन केले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 16 ऑगस्ट रोजी स्वतःच उद्घाटन केले. त्यामुळे चिडून तिथल्या पालक मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या सामानासह बाहेर काढले आहे. तसेच इथले ओबीसी अधिकारी यांनाही निलंबित केले. याचा निषेध म्हणून आज ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मार्फेत निवेदन पाठवण्यात आले आहे.
या निवेदनात ओबीसी विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृहाचा ताबा द्यावा. तसेच ओबीसी अधिकारी यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे असे नमूद केले आहे. महाराष्ट्रातील ओबीसींचे नेते आणि ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी या बाबीत गंभीरपणे लक्ष घातले आहे.आजच ते मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार स्वप्निल पवार यांना निवेदन देताना अनिल खडके, प्राचार्य शिवाजीराव माळकर, ओबीसी बहुजन पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.