डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू-नातेवाइकांचा आरोप

0
526

देवरीच्या ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

डॉ. उर्वशी येडे यांचेसह इतर कर्मचाऱ्यांवर झाली कार्यवाही

देवरी,दि.२३-अज्ञात कीड्याने चावल्यामुळे देवरीच्या ग्रामीण रुग्णलयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत योग्य उपचार न केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केल्यामुळे रुग्णालयात चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. संबंधित डॉक्टर यांच्या निलंबनाची मागणी या प्रकरणामुळे समोर आली आहे. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक यांनी डॉ उर्वशी येडे यांचेसह दोन अधिपरिचारिकांवर कार्यमुक्तीची कार्यवाहीचे पत्र दिले आहे.

मृताचे नाव देवराम नारायण गावळ (वय५५) राहणार पालांदूर जमी, तालुका देवरी असे आहे.

सविस्तर असे की, मृत देवराम याला मध्यरात्री एक अज्ञात कीडा चावल्याने त्याच्या कानाला सूज आली. यामुळे देवरामच्या नातेवाइकांनी त्याला  सकाळी सहा वाजेच्या दरम्यान देवरी येथील डॉ.अमित येडे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले. याठिकाणी डॉ. येडे यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार करून रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवता यावे, यासाठी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याची सूचना केली.

त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी देवरामला लगेच ग्रामीण रुग्णालयाच दाखल केले असता तेथे कर्तव्यावर असलेले डॉक्टर  उपस्थित नव्हते. काही वेळाने डॉ. उर्वशी येडे ह्या रुग्णालयात पोचल्या. यावेळी रुग्णावर योग्य उपचार करण्यात आला नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. काही  वेळाने रुग्णाची प्रकृती खालावत चालल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णाला गोंदियाला रेफर करण्याची विनंती संबंधित डॉक्टरांकडे केली. मात्र नातेवाइकांची मागणी डॉक्टरांनी धुडकावून लावत रुग्णाला तेथेच ठेवले. पुढे रुग्णाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मृत्यूच्या २ मिनिटांपूर्वी रेफर करण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र लगेच रुग्ण दगावल्याने रेफर प्रक्रिया केल्या गेली नाही.

या प्रकरणात रुग्णावर वेळेवर योग्य उपचार केल्या गेला असता तर रुग्णाचा जीव गेला नसता. या प्रकरणात जबाबदार डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

देवराम गावळ यांच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबरदार- नयेंद्र रामदास गावळ

माझे काका देवराम यांना मध्यरात्री एका अज्ञात कीड्याने कानाला दंश केल्यामुळे त्यांना सकाळी आम्ही देवरी येथे उपचारासाठी आणले. प्रथम डॉ. येळे यांच्या दवाखान्यात उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काका यांना ग्रामीण रुग्णालयात सुमारे सहा-साडेसहा दरम्याने दाखल केले. यावेळी येथे डॉक्टर उपस्थित नव्हते. काही वेळीने डॉक्टर पोचले. डॉक्टरांनी माझ्या काकांचा उपचार गांभीर्याने केला नाही. रुग्णाचे कानाला कीडा चावल्याचे डॉक्टरांना सांगितले. नंतर रुग्णाला छातीत दुखायला लागल्याने व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. येथे उपचार योग्य होत नसल्याचे पाहून आम्ही गोंदियाला रेफर करण्याची विनंती केली. पण डॉक्टरांनी आमची विनंती धुडकावून लावली. शेवटी मृत्यूच्या २-३ मिनिटे अगोदर गोंदियाला नेण्याची सूचना केली.पण काहीच मिनिटांमध्ये रुग्णाने जीव सोडला. याला जबाबदार रुग्णालयातील कर्मचारी आहेत. त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि डॉक्टरांचे निलंबण व्हावे, अशी आमची मागणी आहे.

रुग्णाची प्रकृती स्थिर होती- डॉ. अमित येडे

सकाळी सुमारे सहाच्या दरम्यान पालांदूरवरून देवराम गावळ हा रुग्ण माझ्या दवाखान्यात उपचारासाठी आला. त्याने कीडा चावल्याने कानावर सूज आल्याची तक्रार केली. मी त्याच्यावर प्राथमिक उपचार केला. रुग्णाला निगराणी खाली ठेवण्याची गरज असल्याचे माझे मत झाल्याने मी रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. रुग्णाची प्रकृती एकदम स्थिर होती. त्याला इतर कोणताही त्रास होत नसल्याचे माझे तपासणीत दिसून आले होते.

रुग्ण दगावल्याची सूचना पोलिसांनी दिली. डॉ अन्सारी

पालांदूर जमी येथील देवराम गावळ हा रुग्णालयात सकाळी दाखल करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. उर्वशी येडे या कर्तव्यावर होत्या. रुग्णाची प्रकृती भरती करतेवेळी स्थिर होती, असे दिसून येते. रुग्णाचा मृत्यू हा सकाळी ११.१० वाजे झाला. याची सूचना आम्ही रुग्णांचे नातेवाईक आणि पोलिसांनी दिली.

देवरी ग्रामीण रुग्णालयात हा नेहमीचाच प्रकार-कुलदीप लांजेवार (सामा. कार्यकर्ता)

देवरी तालुका हा आदिवासी आणि दुर्गम भागात असून येथे आरोग्याच्या सोयींचे तीनतेरा वाजले आहेत. रग्णालय प्रशासन नेहमीच मुजोरपणाने वागत असल्याचे नेहमीचेच झाले. आहे. येथे आलेल्या रुग्णांवर योग्य उपचार केला जात नसल्याच्या तक्रारींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या गंभीर बाबीकडे राज्यशासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आले आहे. आजची घटना ही याचीच परिणीती आहे. रुग्णालय प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्याने येथील कर्मचारी अधिकारी आपल्या मनमर्जीने वागत असून हा आदिवासी जनतेच्या जीवीताशी खेळ खेळण्याचा प्रकार आहे. आजच्या प्रकरणी जो कोणी अधिकारी जबाबदाप असेल, त्याला तत्काल सेवेतून निलंबित करण्यात यावे.