मालवण:-बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज येथे ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडी व युवतीसेनेच्या फोवकांडा पिंपळ येथे आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत महिला व शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वाक्षऱ्या करत या आंदोलनाला पाठिंबा दिला.
महिलांना सुरक्षा मिळत नसल्याबाबत व अत्याचारातील आरोपींना तात्काळ शिक्षा मिळत नसल्याबाबत यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, पंधराशे रुपये नको… सुरक्षा द्या अशा घोषणा यावेळी सहभागी महिलांनी दिल्या.
यावेळी पूनम चव्हाण, दीपा शिंदे, सेजल परब, निनाक्षी मेथर, सूर्वी लोणे, माधुरी प्रभू, तृप्ती मयेकर, रूपा कुडाळकर, रविना लुडबे, लक्ष्मी शिरसेकर, भारती आडकर, दीपा बिरमोळे, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, नितीन वाळके यांच्यासह इतर महिला आघाडी व युवतीसेनेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.