लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

0
120

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे पार पडली असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहि‍णींना (Ladki bahin yojana) 3000 रुपये दरमहा देण्यात येतील. यासह, शेतकऱ्यांसाठी कर्ममाफीची योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी केलेल्या 2100 रुपयांपेक्षा 900 रुपये जास्त रक्कम लाडक्या बहि‍णींना देण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांन मोफत बसप्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. लोकसेवेची पंचसुत्री म्हणत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरुन आज महायुतीचा विधानसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
भाजपच्या सरकारनं महागाईचा त्रास, गॅस सिलिंडरच्या दराचा त्रास, बेरोजगारीचा त्रास सर्वाधिक महिलांना होतो. त्यामुळं महाराष्ट्राच्या महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये पाठवणार आणि राज्यात सर्वत्र मोफत प्रवास या गॅरंटी देणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात जातनिहाय जनगणनेवर चर्चा केली. भारतात दलित लोकसंख्या 15 टक्के आहे. 8 टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. मात्र, आजपर्यंत या देशात मागासवर्गाचे किती लोक आहेत हे माहिती नाही. कोणी म्हणत 50 टक्के, 55 टक्के कोणी म्हणत 60 टक्के आहे. कुणालाच माहिती नाही.केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा जातनिहाय जनगणना होईल. आरक्षणाला लावण्यात आलेली 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकू असं राहुल गांधी यांनी सांगितलं. संविधान संपल्यास भारतातील गरीब लोकांजवळ, आदिवासी लोकांजवळ काही राहणार नाही. जे शिक्षण, आरोग्य, जमिनीचं संरक्षण संविधान करतं. अदानींना काही प्रमाणात रोखण्यात आलंय ते संविधानामुळं रोखण्यात आलंय, असं राहुल गांधी म्हणाले. सर्व महापुरुषांचा आवाज संविधानात आहे, गरिबांचा, शेतकऱ्यांचा आवाज संविधानात आहे, असं राहुल गांधी म्हणाले. काही झालं तरी संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, संविधानाला संपवू देणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

जेव्हा आम्ही भारताच्या संस्था, माध्यमं , कॉर्पोरेटला पाहतो , न्यायव्यवस्था पाहतो तेव्हा तिथं त्या संस्थांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि खुल्या प्रवर्गातील गरीब लोक दिसत नाहीत. त्यामुळं आम्हाला देशात एक ऐतिहासिक पाऊल ऊचलावं लागेल. देशात जातनिहाय जनगणना करावी लागेल. पॉवर स्ट्रक्चरमध्ये कुणाची किती भागिदारी असेल, पैसा कुणाच्या हातात आहे, संस्था कुाच्या हातात आहे. लोकसभा निवडणुकीत सांगितलं होतं की आमचं सरकार बनल्यास जातिनिहाय जनगणना करु असं सांगितलं होतं. कर्नाटक आणि तेलंगणात जातनिहाय जनगणनेचं काम सुरु केलं आहे. तेलंगणातील सर्व्हेतील प्रश्न जनतेनं ठरवलेले आहेत,असं राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रात सरकार आल्यास जातनिहाय जनगणनेचं काम सुरु करणार आहोत.

आमदार खरेदी करुन तुमचं सरकार पाडलं गेलं. आता तुमचं सरकार बनवा, जे तुमचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

महाविकास आघाडीच्या 5 प्रमुख घोषणा
1. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.

2. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.

3. जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.

4. 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.

5. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत.

नाना पटोले यांचा फडणवीसांवर पलटवार
आज आम्ही दिक्षाभुमीवर गेलो होतो, बाबासाहेब यांच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, ⁠तो हात आम्ही लावू देणार नाही. समतेची लढाई दिक्षाभूमीवर सुरू केली, ⁠राहूल गांधी जे संविधान दाखवतात त्या लाल रंगावरुन फडणवीस यांनी नक्षलवादी म्हटल, ⁠मात्र आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो, असे म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर संविधानाच्या मुद्द्यावरुन पलटवार केलाय.

वर्षा गायकवाड यांनी वेधलं धारावी प्रकल्पाकडे लक्ष
राहुल गांधी यांना मी विनंती करते की, त्यांनी मुंबईच्या लढ्यात सहभागी झालं पाहिजे, ⁠मुंबईच्या जमीन विकल्या जात आहेत. ⁠मुंबईची लूट केली जात आहे, ⁠धारावीला लुटायचं काम सुरू आहे. प्रत्येकाच्या घराची लढाई सुरु आहे, ⁠राहूल गांधी तुम्हाला यासाठी यावा लागेल, ⁠तुम्हाला या ठिकाणी यावा लागेल आणि लढाई लढावी लागेल, असे म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी राहुल गांधींने मुंबईतील धारावी पुनर्वसन विकास प्रकल्पाकडे लक्ष वेधले.